Wed, Nov 21, 2018 20:27होमपेज › Kolhapur › सहा महिन्यांत पेट्रोल ७, डिझेल १० रुपयांनी वाढले

सहा महिन्यांत पेट्रोल ७, डिझेल १० रुपयांनी वाढले

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 29 पैसे तर डिझेलच्या दरात 24 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल  7 रुपये तर डिझेलमध्ये 10 रुपयांची वाढ झाली आहे.

अंतरराष्ट्रीय पातळीवर तेल दरात होणार्‍या बदलावर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला; पण हा निर्णय आता ग्राहकांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा काही काळ वगळता पेट्रोल  व डिझेल्या किमतीत सतत वाढ होत आहे. वाढत्या किमती या महागाईला निमंत्रण देणार्‍या आहेत. महाराष्ट्रात इंधनावरील अतिरिक्त सेस कमी केला तरी पेट्रोल व डिझेलच्या किमती 8 ते 9 रुपयांनी कमी होऊ शकतात; पण राज्य सरकार या कराच्या रूपातून मिळणारे उत्पन्न सोडण्यास तयार नसल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.  
 डिसेंबर 2017 मध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर 76 रुपये 85 पैसे होता तर डिझेलचा प्रति लिटर दर  60 रुपये 53 पैसे होता. गेल्या सहा महिन्यांत किरकोळ पैशात होणार्‍या बदलाचा फारसा परिणाम ग्राहकांना जाणवत नाही. पण प्रत्यक्षात ही दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. आज पेट्रोलचा प्रति लिटर दर  83 रुपये 77 पैसे झाला आहे. तर डिझेल 70 रुपये 55 पैसे झाले आहे.  त्यामुळे दररोजच्या इंधनदरवाढीने नागरिक हैराण झाले असून राज्य सरकारने इंधनावरील अतिरिक्त सेस कमी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.