Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Kolhapur › इतिहासाच्या साक्षीने 'सह्याद्री' ची पन्हाळा-पावनखिंड मोहीम (Video)

इतिहासाच्या साक्षीने 'सह्याद्री' ची पन्हाळा-पावनखिंड मोहीम (Video)

Published On: Jul 12 2018 7:55PM | Last Updated: Jul 12 2018 9:54PMनिलेश पोतदार, पुढारी ऑनलाईन 

जय भवानी, जय शिवाजी असा अखंड जयघोष, हलगीचा कडकडाट, वीरश्री निर्माण करणारे पोवाडे आणि मर्दानी खेळाची धाडसी प्रात्‍यक्षीक त्‍यातच वरून कोसळणारा पाऊस हा माहोल होता पन्हाळ गडावर. निमित्त होतं पन्हाळा पावनखिंड मोहीमेचं. शिवकाळात १२ आणि १३ जुलै १६६० ला घडलेल्या स्‍फुर्तीदायी इतिहासाच्या स्मृती जपण्याच्या उद्देश्याने सह्याद्री प्रतिष्ठानकडून पावनखिंड संग्राम दिनाचे आयोजन केलयं. या अंतर्गत पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावरून साहसी पदभ्रमंती मोहिमेला आज (गुरूवार दि १२)  सुरूवात झाली. बाजीप्रभूंच्या पुतळ्याला वंदन करुन शेकडो शिवभक्‍तांनी पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेला जोशपूर्ण वातावरणात सुरूवात केली. 

शिवचरित्रात असे अनेक प्रसंग आहेत. जे पोवाड्‍याच्या माध्यमातून ऐकताना किंवा शिवचरित्र वाचताना अंगावर शहारे येतात. शिवरांयांचे जीवन म्‍हणजे एक धगधगते अग्‍निकुंडच. शिवरायांच्या स्‍वराज्‍याच्या कार्यात अडथळे आणणार्‍या अनेक शक्‍ती होत्‍या, मात्र शिवरायांनी मुत्‍सद्‍देगिरी,अतुलनीय पराक्रम, धाडस, शौर्य आणि हिंदवी स्‍वराज्‍य निर्मितीच्या प्रबळ इच्छाशक्‍तीच्या जोरावर पाचही पातशाह्यांच्या तोंडचे पाणी पळवले. अशा या पराक्रमी साहसी मोहिमांनी भरलेल्या शिवचरित्रात पन्हाळा पावनखिंडच्या रणसंग्रामालाही महत्‍वाचे स्‍थान आहे. 

पावनखिंडीतला रणसंग्राम :

सिध्दी जोहरच्या वेढ्‍यातून शिवराय शिताफीने निसटले. रयतेचे स्‍वतंत्र सार्वभौम स्‍वराज्‍य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींच्या रक्षणासाठी शेकडो मावळ्‍यांनी आपल्‍या प्राणाची बाजी लावली. या मोहीमेत ६०० बांदलांनी  सहभाग घेतला होता. पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर प्रचंड रणकंदन झाले. यात ३०० बांदल कामी आले. तर शिवा काशीद, फुलाजी प्रभू - देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात मावळ्‍यांनी आपल्‍या जीवाची आहूती दिली. बांदलांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी बांदल घराण्याला पहिल्‍या पानाचे मानकरी घराणे म्‍हणून मानाची तलवार छ. शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांनी बादलांना बहाल केली. 

इतिहासातील स्‍फूर्तीदायी अशा देदीप्यमान घटनेच्या स्‍मृती जपण्याच्या उद्‍देशाने ३५८ व्या स्‍मृतीदिनानिमित्‍त शिवकाळातील त्‍याच तारखांना म्‍हणजे १२ व १३ जुलै रोजी पन्हाळा ते पावनखिंड साहसी पदभ्रमंती मोहिमेचं सह्याद्री प्रतिष्‍ठानकडून दरवर्षी आयोजन केल जातं. सह्याद्री प्रतिष्‍ठानची यंदाची ही २२ वी मोहीम आहे. आज (गुरूवार दि. १२) जुलै रोजी पन्हाळ्‍गडावरील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्‍याचे मान्यवरांच्या हस्‍ते पूजन करून मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी शिवभक्‍त युवक आणि युवतींनी हलगीच्या ठेक्‍यावर मर्दानी खेळाची प्रात्‍यक्षीक सादर करत उपस्‍थित शिवभक्‍तांचा उत्‍साह वाढवला. यावेळी बांदलांचे १४ वे वंशज राजेंद्र पोपटराव बांदल, सह्याद्री प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे, पन्हाळा नगराध्यक्षा रूपाली धडेल यांच्यासह शिवभक्‍त मोठ्‍या संख्येन उपस्‍थित होते. 

पन्हाळागडावरून या मोहीमेला सुरूवात झाली. सह्याद्रीच्या रांगेतील निसर्गसंपत्‍तीने परिपूर्ण मसाई पठार मार्गे करपेवाडी -आंबेवाडी पांढरेपाणी मार्गे पावनखिंड अशा मार्गावर पदभ्रमंतीला सुरूवात झाली. या डोंगर मार्गातील चढ उतार, खाचखळगे, चिखल आणि जंगलाने व्यापलेल्‍या मार्गावरून मार्गक्रमन करताना मुसळधार पाऊस आणि कडाक्‍याच्या थंडीची पर्वा नकरता शिवनामाचा जयघोश करत शिवभक्‍तांनी आज पदभ्रमंतीला सुरूवात केली. या मोहीमेची सांगता दि १३ जुलै रोजी पावनखिंड येथे होणार आहे. या मोहिमेत अबालवृध्दांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता.