Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Kolhapur › करवीरमधील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर

करवीरमधील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर

Published On: Mar 10 2018 9:09PM | Last Updated: Mar 10 2018 9:09PMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

करवीर तालुक्यातील आणि विशेषतः करवीर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यात काही पदाधिकार्‍यांचाही समावेश असल्याने राष्ट्रवादीला खिंडार पडणार काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सध्या सुरु असलेल्या महाडिक विरुद्ध मुश्रीफ या राजकीय संघर्षाला ही घटना कारणीभूत असावी आणि त्यातूनच लोकसभेच्या पेरणीसाठी महाडिक यांच्या पाभरीचा (कुरी) वापर करण्याची भाजपची चाल असावी, असेही राजकीय जाणकारांचे अनुमान आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार बदलण्याचे सुतोवाच केल्याने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह खासदार धनंजय महाडिकसुद्धा सावध झाले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपणच पुन्हा लढणार असल्याचे खा. महाडिक जाहीरपणे बोलत आहेत. लोकसभेचे रणांगण अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्याने राजकीय रस्सीखेचीला वेग आला आहे. त्यातूनच महादेवराव महाडिक आणि कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची बैठक झाली. श्री. घाटगे सध्या भाजपमध्ये असून त्यांच्याकडे म्हाडाचे (पुणे) अध्यक्षपदही आहे. कागल तालुक्यातील राजकारणात घाटगे यांचा गट सक्रीय असल्याने लोकसभा आणि विधानसभेलाही त्याचा फायदा घेण्याचा इरादा भाजपचा आहे. त्यातूनच त्यांच्याशी संपर्क वाढविण्याचा महाडिक कुटुंबियांचा उद्देश स्पष्ट होत असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत.

आमदार मुश्रीफ यांनी खा. धनंजय महाडिक यांना थेट आव्हान दिल्याने राजकीयदृष्ट्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. मुश्रीफ यांच्या या हाबकी डावाची महाडिक यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे त्यांच्या अलिकडील राजकीय डावपेचावरून दिसून येत आहे. मुश्रीफ यांना कागल तालुक्यातच कोंडीत पकडण्यासाठी महाडिक यांनी जाळे पेरण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून समरजीतसिंह घाटगे यांच्याशी त्यांची बैठक झाली. या बैठकीतील काही तपशील बाहेर पडल्याची चर्चा आहे. त्यानुसार विधानसभेसाठी माजी आमदार संजय घाटगे यांना चाल देत समरजितसिंह यांनी आपला गट शाबुत ठेवत भाजपला बळ देण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास कागल तालुक्यातील दोन घाटगे गट एकत्र आल्याने मुश्रीफ यांना शह बसेल, असे महाडिक आणि पर्यायाने भाजपचे गणित असावे. या सर्व घडामोडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असाव्यात अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

कागलमध्ये राजकीय गटांची फोडाफोड करण्यापाठोपाठ करवीर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही भाजपच्या वाटेवर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसातच याचा फैसला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या करवीरमध्ये राष्ट्रवादीचे आहेच कोण असा प्रश्‍न उपस्थित होत असला तरी एकेकाळी करवीर तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता हे देखिल विसरुन चालणार नाही. ककोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम करवीर तालुक्यात माजी मंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यांच्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे सुत्रे गेल्याने कागल, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीचा विस्तार झाला. आज करवीर तालुक्यात राष्ट्रवादीचे बळ कमी असले तरी खानविलकर यांच्या काळातील अनेक कार्यकर्ते पडद्याआड असून ते भाजपच्या गोटात सहजपणे जातील, असे संकेत आहेत. खुद्द खानविलकर यांच्या पत्नी राजलक्ष्मी आणि चिरंजीव विश्‍वविजय खानविलकर सध्या भाजपबरोबरच आहेत. त्यामुळे करवीरमध्ये भाजपचे बळ वाढल्यास नवल वाटू नये, असेच जाणकारांचे मत आहे.