Sun, Jul 21, 2019 12:54होमपेज › Kolhapur › धर्माच्या नावावर मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही

धर्माच्या नावावर मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही

Published On: Dec 07 2018 1:50AM | Last Updated: Dec 07 2018 1:37AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

संविधानाप्रमाणे केवळ मागास जातींना आरक्षण देता येते. धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, जर अशा पद्धतीने आरक्षण दिले, तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मुस्लिम बोर्डिंगमध्ये आयोजित बैठकीत मंत्री पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले.

ना. पाटील म्हणाले, मुस्लिम समाजातील अनेक जातींना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळतो. उर्वरित जातींना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा केला जाईल. मुस्लिम समाजातील महिला आणि मुलींच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध राहील. मुलींच्या शिक्षणासाठी मी स्वत: कुठेही कमी पडणार नाही. आतापर्यंत अनेक मुस्लिम मुलींना लॅपटॉप, शाळेची फी, खासगी शिकवणीची फी अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. यापुढेही ही मदत सुरूच राहील. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुस्लिम समाजाविरोधात आहे, हा गैरसमज दूर केला पाहिजे. धर्माची गोष्ट दूर करून या धर्मातील महिला-मुलींच्या विकासासाठी प्रयत्न करू या. राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते. निवडणूक झाली, की पुन्हा एकमेकांचे प्रश्‍न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू या. अल्लाह असो अथवा परमेश्‍वर दोघांनीही मला भरभरून दिले आहे. त्यामुळे मदत करण्यात मी कधी कमी पडणार नाही. मदत करणे आणि राजकारण हे भिन्न आहे. मला मदत करावीशी वाटते म्हणून मी मदत करतो. त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम तरुणांनी रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, मुस्लिम समाज हा बहुजन समाजासोबत राहून सामाजिक सलोख्याचे काम करतो. मुस्लिम बोर्डिंग बहुजन समाजाच्या विविध आंदोलनांचे केंद्रस्थान बनले आहे. मुस्लिम बोर्डिंगसाठी मदत करावी, जिल्ह्यातील दफनभूमीसाठी प्रयत्न करावेत. 

आदिल फरास यांनी समाजातील विविध समस्या सांगून जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा विचार करून सरकारने आणि पालकमंत्र्यांनी मदत करण्याचे आवाहन केले. बैठकीस पापाभाई बागवान, कादरभाई मलबारी, बाबा पार्टे, रहीम बागवान, नजीर देसाई, इकबाल देसाई, सलीम मुल्ला, रियाज सुभेदार, आसिफ मोकाशी आदींसह पदाधिकारी, सभासद, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.