Wed, Jul 24, 2019 08:38होमपेज › Kolhapur › ‘स्थायी’साठी चुरस अन् बंडखोरीची धास्ती

‘स्थायी’साठी चुरस अन् बंडखोरीची धास्ती

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 12:43AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मेघा पाटील, अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण या तिघांनी पदाचा आग्रह धरल्याने नेत्यांना बंडखोरीची धास्ती लागली आहे. परिणामी, सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी सहा-सहा महिने पदाचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी तीन ते पाच या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यातच राहणार आहे. अजिंक्य चव्हाण यांनी बुधवारी नगरसचिव कार्यालयातून अर्ज घेऊन तो भरूनही ठेवला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दुपारी सर्किट हाऊसमध्ये पाटील व पीरजादे यांच्या मुलाखती घेतल्या. दोघांनीही आपल्यालाच पद मिळावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या मेघा या स्नुषा आहेत. स्थायी समितीत सोळा सदस्यांपैकी 9 महिला आहेत. त्यामुळे स्थायी सभापतिपद महिलेला देऊन राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेत इतिहास निर्माण करावा, अशी मागणी मेघा पाटील यांनी केली आहे. तर पीरजादे यांनीही स्थायीतील सर्व सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून पदासाठी आग्रह व्यक्‍त केला आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयंत पाटील, उपमहापौर सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, आदील फरास आदी उपस्थित होते. चव्हाण हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने गुरुवारी ते मुश्रीफ यांची भेट घेणार आहेत. 

जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली 12 फेब्रुवारीला स्थायीसह परिवहन समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती यांच्या निवडी होणार आहेत. त्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यामुळे तिन्ही पदांसाठी त्या-त्या पक्षाच्या नेत्यांना बुधवारी सभापतिपदासाठीचे नाव निश्‍चित करावे लागणार आहे. सर्वच इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी टाळण्यासाठी त्यापैकी गुरुवारी दुपारी एकाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फक्‍त निवडीवर शिक्‍कामोर्तब होईल. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसच्या वतीने सुरेखा शहा यांचे, तर शिवसेनेतून परिवहन सभापतिपदासाठी राहुल चव्हाण यांचे नाव निश्‍चित झाले आहे. 

बंद पाकिटात नावे कुणाची?

उपमहापौर सुनील पाटील यांनी स्थायी सभापतिपद निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. इच्छुकांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ सांगतील त्याचा अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सादर केला जाईल. भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीनेही निवडणूक लढविण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांच्याशी चर्चा करून उमेदवारांची नावे निश्‍चित करणार असल्याचे ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी सांगितले. त्यांच्याकडूनही बंद पाकिटातूनच नावे येणार आहेत. परिणामी, बंद पाकिटातून गुरुवारी कुणा-कुणाची नावे येतात, याविषयी महापालिका वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.

108 कोटी रुपयांच्या निविदेची मनपात चर्चा

कोल्हापूर ः शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी तब्बल 115 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 108 कोटींची निविदा काढण्याची प्रक्रिया गेले काही दिवस प्रशासकीय पातळीवर सुरू होती. विद्यमान स्थायी समितीची मुदत गुरुवारी संपत असल्याने बुधवारी दिवसभर त्याबाबत जोरदार हालचाली झाल्या. महापालिकेची कोणतीही निविदा वाटाघाटीशिवाय निघत नसल्याचे सांगण्यात येते. आपल्याच कालावधीत निविदा प्रसिद्ध व्हावी, यासाठी विद्यमान स्थायी समितीतील सदस्यांसह कारभारी, तर काही कारभार्‍यांच्या वतीने नव्या समितीच्या कालावधीतच निविदा निघावी यासाठीही व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यासाठी रात्रही जागून काढण्यात आली. एकूणच दोन्ही बाजूंच्या हालचालींमागे मोठा ‘अर्थ’ दडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.