Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Kolhapur › मोरजाईचे पठार पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत

मोरजाईचे पठार पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:30AMशिरगाव : वार्ताहर

दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सभोवती घनदाट हिरवीगार झाडे, दुर्मीळ वनौषधींचे भांडार अन् उंच पठारावर एकाच दगडात कोरलेली भव्य पांडवकालीन लेणी. बोरबेट येथील रम्य मोरजाईचे पठार पर्यटकांना साद घालत आहे. पर्यटन दृष्ट्या अपेक्षित असणार्‍या पठाराकडे शासनाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे.

मोरजाई डोंगराच्या पायथ्याला वसलेले बोरबेट हे ठिकाण गगनबावडा तालुक्यात आहे. गावानजीकच एका उंच डोंगरावर दीडशे एकरांचे हे विस्तीर्ण पठार असून दाजीपूर अभयारण्याची हद्द सुरू होते त्यामुळे गवा, रानडुकरे, सांबर, साळींदर आदी प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. मोरजाई पठाराची उंची सुमारे 9025 फूट असून पठारापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पठारावर पाय ठेवताच एका रम्य वातावरणात आल्याची जाणीव होते. एकामागे एक अशा उभ्या असलेल्या दगडी कमानी मोरजाई मंदिराची दिशा दर्शवितात. मोरजाई देवीचे खूप प्राचीन पांडवकालीन भूमिगत मंदिर आहे. हे मंदिर एकाच दगडात कोरलेले आहे. मंदिराजवळ जाईपर्यंत मंदिराचे स्वरूप लक्षात येत नाही. दुरून फक्त जमिनीवर असणारे मंदिराचे छोटेखानी शिखर नजरेस पडते.

पठारावर सगळीकडे लहान मोठे दगड पसरले आहेत. मंदिरापर्यंत सात दगडी कमानी होत्या. त्यापैकी काहींचे अस्तित्वही जाणवत नाही. मंदिराच्या परिसरातही चबुतरे, लहान दगडी मनोरे, मंदिरातील एकसारख्याच पण आकाराने लहान मोठ्या असणार्‍या 60 ते 70 मूर्ती, अंधारात बुडालेला गाभारा, बाजूलाच दिसणारे गुहेचे तोंड या सर्व गोष्टी गुंता वाढविणार्‍या आहेत. पठारावर अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या भेगा पडलेल्या दिसतात. पठारावरून पश्‍चिमेला किनारपट्टीचे दर्शन तर पूर्वेला सह्याद्रीचे उंचकडे पाहून मन भारावून जाते. 

जिल्ह्यातील हजारो भाविक रथसप्तमीला येथे येतात. या दिवशी पठार भाविकांनी फुलून जातो. शासनाने येथे पर्यटन वाढीच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे. डोंगरावर जाण्यासाठी सुलभ व सुरक्षित रस्ता, कायमस्वरूपी वीज, दूरध्वनी व पाण्याची सोय करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
 

Tags : kolhapur Morjai Plateau, development