Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Kolhapur › मेगा नोकरभरतीमुळे तरुणाईने टाकलाय ‘टॉप गीअर’

मेगा नोकरभरतीमुळे तरुणाईने टाकलाय ‘टॉप गीअर’

Published On: Dec 07 2018 1:50AM | Last Updated: Dec 07 2018 1:06AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या  72 हजार पदांवर मेगा भरतीच्या घोषणेचा सकारात्मक  परिणाम तरुणाईवर दिसू लागला आहे. कारण, बहुसंख्य तरुण विविध अभ्यासिकांत वाचनात गुंग झाला आहे. तसेच शारीरिक चाचणीची तयारी म्हणून भल्या पहाटे मैदानांवरही मोठ्या प्रमाणावर तरुणाई धावताना दिसत आहे. चोवीस तास सोशल मीडियावर पडीक असणार्‍यांनी तरुणांनी या डिजिटल कट्ट्याला तात्पुरते ‘बाय’ केले आहे, तर व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधूनही काही तरुण ‘लेफ्ट’ होत आहेत. एकूणच तरुणाईने करियरच्या मोटारीचा टॉप गीअर टाकला असल्याचे चित्र आहे. 

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विविध विभागांत  72 हजार पदांची भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यात तातडीने 36 हजार व त्यानंतर 36 हजार पदे भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महसूल, पोलिस, शिक्षण, आरोग्य आदी सर्वच क्षेत्रांतही भरती केली जाणार आहे. उच्चशिक्षितांची प्रचंड संख्या असल्याने बेरोजगारीचे प्रमाणही मोठे आहे. यासह सरकारी नोकरी हे बहुतेकांचे स्वप्न असते. सरकारी नोकरी मिळाली, की लाईफ सेटल झाले, असे तरुण चर्चेत नेहमीच बोलून जातात. मेगा भरतीची घोषणा झाल्यापासून तरुणांनी संदर्भ साहित्य वाचण्यासाठी पुस्तकांच्या दुकानांपासून  ग्रंथालयांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. 

बर्‍याच वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी पदांची भरती होत असल्याने साहजिकच आपल्याला नोकरी मिळावी, यासाठी तरुणाई आत्मविश्‍वासाने परिश्रम  करताना दिसू लागली आहे. हे चित्र सोशल मीडियावरील निरर्थक वादांपेक्षा निश्‍चितच समाधानकारक आहे.  

मिशन करियर नावाने ग्रुप 

 तरुणाईने डिजिटल प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करत व्हॉट्स अ‍ॅपवर मिशन करियर, मिशन जॉब, हम होंगे कामयाब, सक्सेस पासवर्ड अशा नावांनी ग्रुप्स बनवले आहेत. या ग्रुपवर फक्त परीक्षेसंबंधीच चर्चा करण्याची अट आहे. या ग्रुपमध्ये परीक्षेस बसणारे इच्छुक तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांचाही समावेश करण्यात आला आहे.