Fri, Jul 19, 2019 17:50होमपेज › Kolhapur › ‘मेडा’ महाव्यवस्थापकांना दणका

‘मेडा’ महाव्यवस्थापकांना दणका

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:57AMकोल्हापूर : सदानंद पाटील

महाऊर्जा अर्थात ‘मेडा’चे विभागीय व्यवस्थापक मुरारी पुजारी यांना अतिरिक्त महासंचालकांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच कारभारा पुण्याच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. पुजारी यांच्याविरोधात गंभीर तक्रारी होत्या. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, संशयास्पद व अपारदर्शक कारभाराचा ठपका ठेवून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. 

महाऊर्जा विभागाचे नागाळा पार्क येथे कार्यालय आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणे व त्यास प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम हा विभाग करतो. शासकीय कार्यालयात अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करून ऊर्जा बचत करणे तसेच अलीकडेच शेतीसाठीही अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील आहे. शेतीपंपासाठी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा पुरवठा करण्यावरून कोल्हापूरच्या विभागीय कार्यालयात बरेच दिवस धुसफूस सुरू होती. ही धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.  महाऊर्जाचे महासंचालक यांनी दिलेल्या सूचना व ऊर्जामंत्र्यांकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुजारी यांना नोटीस काढण्यात आली आहे. 

नोटिसीत म्हटले आहे, कोल्हापूर कार्यालयासाठी भाडे तत्त्वावर वाहन घेण्यात आले. मात्र, त्यास महासंचालकांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही. तसेच हे वाहन घेताना विशिष्ट व्यक्तीस लाभ होईल, अशीच कार्यवाही करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापुढे जाऊन सक्षम प्राधिकार्‍यांची मंजुरी टाळण्यासाठी देयकांचे जाणीवपूर्वक विभाजन करण्यात आले आहे. हा सर्व व्यवहार हा संशयास्पद व अपारदर्शक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कार्यालयासाठी आवश्यक असणार्‍या स्टेशनरी खरेदीतही अशीच अनियमितता आहे. पुजारी यांनी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत गाव/कुटुंबाची संख्या चुकीची सादर केल्याचे नियामक मंडळ बैठकीत आढळून आले आहे.  सौर कृषी पंप योजनेंतर्गत प्रत्यक्ष पंप बसवणार्‍या लाभार्थींची संख्या 40 दाखवण्यात आली आहे. मात्र, यातील 5 लाभार्थ्यांनीच आपले लाभार्थी शुल्क भरले आहे. मग उर्वरित 35 लाभार्थ्यांना सौरपंप लाभार्थी शुल्क न भरताच दिले कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सौर कृषी पंप वापराबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याबद्दल वरिष्ठांनी याप्रकरणी ताशेरे ओढले आहेत. पुजारींनी दिलेल्या खुलाशावर काय कारवाई होणार, याकडे विभागाचे लक्ष आहे.