होमपेज › Kolhapur › शुल्कवाढ परिपत्रकांची होळी

शुल्कवाढ परिपत्रकांची होळी

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

न्यायालयीन शुल्कात शासनाने केलेल्या वाढीविरोधात जिल्ह्यातील वकिलांनी निदर्शने केली. गुरुवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने दरवाढीच्या परिपत्रकांची होळी करण्यात आली. दिवसभर न्यायालयीन कामकाजापासून अलिप्‍त राहून वकीलवर्गाने दरवाढीला विरोध दर्शविला. याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. 

शासनाने न्यायालयीन शुल्कवाढ केली आहे. याबाबत जिल्हा बार असोसिएशनने बैठक घेऊन शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. गुरुवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात जमलेल्या वकिलांनी शुल्कवाढीच्या परिपत्रकांची होळी केली. वकिलांनी केलेल्या घोषणाबाजीने न्यायालयीन परिसर दणाणून गेला. मोटारसायकल रॅलीद्वारे वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली. 

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांनी शासनाने सर्वसामान्य पक्षकारांना ही दरवाढ परवडणार नसल्याचे सांगून याचा विचार शासनाने करावा, असे मत व्यक्‍त केले. माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, न्यायालयीन शुल्कवाढ अन्यायकारक आहे. पक्षकारांचा न्यायाच्या प्रतीक्षेत असताना त्यांची आर्थिक घडी बिघडविणारा हा निर्णय असल्याचे सांगितले. अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे म्हणाले, शुल्कवाढीनंतर 10 रुपयांच्या स्टॅम्पची किंमत 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही वाढ जवळपास पाचपट असल्याने अन्यायकारण आहे. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांनी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन सादर केले.