होमपेज › Kolhapur › ‘कळंबा’ हाऊसफुल्ल!

‘कळंबा’ हाऊसफुल्ल!

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 1:02AMकोल्हापूर : दिलीप भिसे

गुन्हे शाबितीकरण (कन्व्हेंक्शन रेट) मध्ये दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाल्याने राज्यातील बहुतांशी कारागृहे हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यात कोल्हापुरातील कळंबा कारागृहातही दाटीवाटीची गर्दी झाली आहे. मंजूर क्षमतेपेक्षा साडेतीनशेवर कैद्यांचा अतिरिक्‍त भार पडला आहे. 3 महिलांसह 23 परदेशी, मोका अंतर्गत 137, तर 59 पळपुट्या बंदीवानांचे आव्हान असल्याने सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे.

कळंबा कारागृहात 1755 पुरुष आणि 34 महिला बंदीवानांची क्षमता मंजूर असताना सद्यस्थितीत दोन हजारांवर कैदी शिक्षा भोगत आहेत. महिन्यापूर्वी ही संख्या बावीसशेवर पोहोचली होती. म्हणजे सरासरी साडेपाचशेवर कैद्यांची अतिरिक्‍त भर पडली होती. शिवाय गुन्हे शाबित झालेल्या महिला कैद्यांच्या संख्येतही कमालीची वाढ झाल्याने त्याचाही ताण कळंबा  कारागृहाला सोसावा लागत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रसह देशभरातील किंबहुना विदेशातील अत्यंत धोकादायक गुन्ह्यात म्हणजे साखळी बॉम्बस्फोट, गँगस्टर्स, आंतरराष्ट्रीय तस्करी, अपहरण, खुनासह गंभीर गुन्ह्यांतील घातक ठरणार्‍या साडे आठशेवर कैद्यांची सुरक्षिता लक्षात घेतल्यास कारागृह प्रशासनावर अतिरिक्‍त ताण दिसून येत आहे. सोमालियातील शंभरावर समुद्रीचाचे कळंबा कारागृहात वर्षाहून अधिक काळ होते. धडधाकट, उंचीपुर्‍या आणि अत्यंत चलाख चाच्यांवर नियंत्रण ठेवताना वरिष्ठ अधिकार्‍यांसह सुरक्षा रक्षकांची भंबेरी उडत होती.

अप्पर, उपअधीक्षकांसह सुरक्षा रक्षक पदे रिक्‍त
पुण्यातील येरवडा आणि नागपूरनंतर कोल्हापूर येथील कळंबा कारागृहाला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्व आहे. वास्तविक सहा कैद्यांमागे एक रक्षक असे प्रमाण असताना सद्यस्थितीत अधिकार्‍यासह सुरक्षा रक्षकांचे प्रमाण कमी आहे. कारागृह  अधीक्षकांसह अप्पर पोलिस अधीक्षक व दोन पोलिस उपअधीक्षकांची पदे मंजूर आहेत; मात्र पोलिस अधीक्षक वगळता अन्य तिन्हीही महत्त्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्‍त आहेत. पोलिस निरीक्षक 5, उपनिरीक्षकांची 13 पैकी 2 पदे रिक्‍त आहेत. सध्या 4 महिला पोलिस अधिकारी कारागृहात कार्यरत आहेत.