Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Kolhapur › ‘गूळ काढण्या’साठी टिक्केवाडीकर शिवारात  

‘गूळ काढण्या’साठी टिक्केवाडीकर शिवारात  

Published On: Feb 21 2018 2:02AM | Last Updated: Feb 21 2018 2:02AMमुदाळतिट्टा : प्रतिनिधी

प्राचीन काळापासून सुरू असलेली गूळ काढण्याची प्रथा जोपासण्यासाठी भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी गावातील ग्रामस्थ चक्क आपली घरेदारे सोडून शेतशिवारात राहावयास गेली आहेत.धनगरांच्या मुक्त जीवनशैलीचा अवलंब करून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने रोगराईपासून मुक्तता होते, अशी  पारंपरिक  कल्पना आजही येथील ग्रामस्थ जोपासतात.आज आपण विज्ञान युगात वावरत असलो तरी  ग्रामीण भागात जुन्या रितीरिवाजांना सांभाळणारी मंडळीही पाहावयास मिळत आहेत.

टिक्केवाडी या धनगरी पांढर म्हणून नावाजल्या जाणार्‍या या गावात ‘गूळ’ काढण्याची प्रथा पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. ही प्रथा श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद निर्माण करणारी असली तरी ग्रामस्थांच्या मते, या प्रथेमुळे गावची एकजूट व आरोग्य टिकण्यास मदत होते.

गर्द हिरवाईच्या कुशीत वसलेलं ‘टिक्केवाडी’ हे छोटेखानी गाव. अष्टभुजा म्हणजेच भुजाई हे या गावचे ग्रामदैवत. देवीवर नितांत श्रद्धा असणारे इथले ग्रामस्थ दर तीन वर्षाला ‘गूळ’ काढतात. गूळ काढणे म्हणजे घरामध्ये कुणीही राहायचं नाही, सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात राहायचं हा इथला दंडक. धनगराप्रमाणे भटकंती करून आरोग्य कमवायचं, शुद्ध हवेत राहणे तसेच पशुप्राण्याची मुलालेकरांना ओळख करून द्यायची आणि वनौषधींचा शोध घ्यायचा, हा या प्रथेमागचा हेतू.

माघवारीनंतर येणार्‍या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. प्रथेच्या निमित्ताने सर्वांच एकत्र राहणं होतं. त्यामुळे आपापसातील वादही निवळून जातात, जाती-पातीची बंधने गळून पडतात. याशिवाय सादर होणार्‍या लोककलेतून चैतन्य फुलतं. सामाजिक समतेला पूरक ठरणारी ही प्रथा आहे. मंगळवार दि.20 फेब्रुवारी पासून टिक्केवाडीकर देवीचे नाव मुखात ठेवत मुक्त जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत देवीच्या नावाचा जयघोष करत या गावकर्‍यांची पहाट उजाडते. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्याला ही मंडळी ‘गूळ’ म्हणतात. गावात शुकशुकाट असला तरी इथली शाळा मात्र सुरू आहे. इथल्या प्रत्येक घरामध्ये पदवीधर झालेली एक तरी व्यक्ती आढळते; पण या प्रथेला ही सुशिक्षित मंडळी अंधश्रद्धा समजत नाहीत. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन आदी कलांमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पै-पाहुणे एक-दोन दिवस गुळ्यात राहण्यासाठी आवर्जून येतात.

पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे गावकर्‍यांच्या भावना दडलेल्या आहेत. भुजाई देवी गावकर्‍यांचे संरक्षण करते, ही इथल्या लोकांची श्रद्धा आहे. देवीला कौल लावून गावकरी ‘गूळ’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की आपापल्या घरी लोक परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचावाडा, बसुदेवाचा वाडा, हंड्याचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे ही प्रथा शेतशिवारात पाळत आहेत. प्रथेदरम्यान संपूर्ण गावात चिटपाखरूही नसते. या काळात घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे, जेवण बनवणे, दिवा पेटवणे व घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात; पण यावेळी चोरीसारखे हीन प्रकार अजिबात होत नाहीत. तर शिवारात 25-30 कुटुंबासाठी एकच पाल उभारले जाते. संपूर्ण पालातील लोक रात्री एकाच पंक्तीला बसून वनभोजनाचा आनंद घेत असतात. टिक्केवाडी ग्रामस्थांच्या या अनोख्या प्रथेची सर्वत्र चर्चा  होताना पाहायला मिळत आहे.