Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Kolhapur › ‘चांद्रयान-२’ मोहिमेपूर्वी ‘इस्रो’ प्रक्षेपित करणार दोन नवे उपग्रह!

‘चांद्रयान-२’ मोहिमेपूर्वी ‘इस्रो’ प्रक्षेपित करणार दोन नवे उपग्रह!

Published On: Mar 05 2018 8:23PM | Last Updated: Mar 05 2018 8:23PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

अवकाश भ्रमणातील ‘चांद्रयान-2’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या पूर्वसंध्येला भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्रो) दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेले हे दोन उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, या महिन्याच्या अखेरीस यातील एक उपग्रह पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये स्थिरावेल. तर ‘चांद्रयान-2’ मोहिमेच्या पूर्वीच म्हणजे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच दुसर्‍या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे सोपस्कार पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी दिली आहे.

‘चांद्रयान-2’ ही भारत सरकारची या वर्षातील सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेची तयारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा या प्रक्षेपक भूमीवर सुरू आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत. हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ‘इस्रो’च्या अभ्यासानुसार महिन्यातून एकच वेळ निश्‍चित होते. यानुसार यातील एकूण प्रगतीचा वेग लक्षात घेता एप्रिल 2018 हा या मोहिमेचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असणार आहे. या मोहिमेपूर्वी ‘जीएसएलव्ही-एमके-2’ या प्रक्षेपक वाहनाआधारे ‘जीसॅट-6 ए’ आणि ‘पीएसएलव्ही-सी-41’ या प्रक्षेपक वाहनाआधारे ‘आयआरएनएनएस-2’ या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण प्रस्तावित आहे. यातील 2,140 किलोग्रॅम वजनाचा ‘जीसॅट-6 ए’ हा अतिउच्च क्षमतेचा एस बँड श्रेणीतील दळणवळणासाठी उपयोगात आणला जाणारा उपग्रह आहे. हा उपग्रह भविष्यामध्ये उपग्रहाद्वारे मोबाईल कम्युनिकेशन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या श्रेणीतील ‘आयआरएनएनएस-2’ हा दुसरा उपग्रह नेव्हिगेशन सॅटेलाईट म्हणून ओळखला जातो. ‘इस्रो’ने यापूर्वी अंतरिक्षामध्ये सोडण्यासाठी तयार केलेल्या; पण अपयश आलेल्या ‘आयआरएनएनएस-1 ए’ या उपग्रहाला पर्याय म्हणून तयार करण्यात आला आहे. पृथ्वीच्या परिघापासून 1,500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रभाव निर्माण करणारा हा उपग्रह वेळ आणि ठिकाण याची अचूक माहिती पुरवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास आहे.