होमपेज › Kolhapur › मी काँग्रेसचाच; भाजप प्रवेशाचा प्रश्‍नच नाही : आ. सतेज पाटील

मी काँग्रेसचाच; भाजप प्रवेशाचा प्रश्‍नच नाही : सतेज पाटील

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 2:06AM



कोल्हापूर : प्रतिनिधी  

डॉ. डी. वाय. पाटील यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत मोठे काम आहे. सध्या ते कोणत्याही सक्रिय राजकारणात नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजकारणाच्या पलीकडे पोहोचले आहे. विविध व्यासपीठांवर ते मुक्तपणे विचार मांडत असतात. त्यामुळे माझ्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये. त्यांनी केलेले विधान हे अनावधानाने मांडलेले विचार आहेत. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मी काँग्रेसचाच सक्रिय कार्यकर्ता असून कार्यकर्त्यांच्या पाठबळावर यापुढेही मी पक्षाशीच एकनिष्ठ राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

एन. एस. यू. आय.चा कार्यकर्ता म्हणून मी राजकारणात आलो. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या विचाराने माझी राजकीय वाटचाल सुरू आहे.  माझ्या राजकीय जीवनात नेहमीच मी काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलो असलो, तरी त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारीवरच दोन वेळा विधानसभेत, तर एक वेळा विधान परिषदेचा आमदार झालो. काँग्रेसने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली. या सर्व गोष्टींत काँग्रेसचे कार्यकर्ते, राज्यातील पक्षाचे नेते आणि पक्षश्रेष्ठी यांनी मला नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. काँग्रेस विचारांचा पाईक म्हणून मी गेली 25 वर्षे काम करत आहे. यापुढेही काँग्रेसचाच कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे, असेही आ. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.