Mon, Mar 25, 2019 05:15
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’चे गाय, म्हैस दूध महागले

‘गोकुळ’चे गाय, म्हैस दूध महागले

Published On: Aug 01 2018 1:24AM | Last Updated: Aug 01 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गाय व म्हशीच्या दूध खरेदी दरातील वाढीचा ग्राहकांवर बोजा टाकून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उद्यापासून (ता. 1) गाय व म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली. 

दरम्यान, शासनाच्या नव्या आदेशानुसार गायीच्या पिशवीबंद वगळून उर्वरित दुधाला पाच रुपये अनुदान मिळणार आहे, तरीही ‘गोकुळ’ने विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करून खरेदी दरात केलेली तेवढीच वाढ भरून काढली आहे. 

राज्यात गायीच्या अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर ‘गोकुळ’सह राज्यातील सर्वच दूध संघांनी गाय दुधाच्या खरेदी दरात मोठी कपात केली होती. ‘गोकुळ’ने कार्यक्षेत्रातील हे दूध प्रतिलिटर 23 रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील दूध प्रतिलिटर 18 रुपये दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. इतर संघांनी तर हेच दूध 16 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले. 

या दर कपातीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 ते 19 जुलैदरम्यान मोठे आंदोलन केले. त्याची दखल घेऊन शासनाने गायीचे दूध प्रतिलिटर 25 रुपये दराने खरेदी करण्याचे आदेश संघांना दिले. या बदल्यात पावडर तयार करणार्‍या संघांना पिशवीबंद विकले जाणारे दूध वगळून उर्वरित दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. 

शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी ‘गोकुळ’ उद्यापासून करणार आहे. दूध खरेदी दरात जेवढी वाढ केली तेवढीच वाढ विक्री दरात करून हा बोजा ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. ‘गोकुळ’ने जिल्ह्यात गायीच्या दूध खरेदी दरात प्रत्यक्षात दोन रुपयांची वाढ केली; पण अनुदान मात्र प्रतिलिटर पाच रुपये मिळणार आहे. ‘गोकुळ’कडे सुमारे साडेपाच लाख लिटर दूध गायीचे संकलित होते. त्यापैकी अडीच लाख लिटर दूध पिशवीतून विकले जाते, उर्वरित तीन लाख लिटर दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे. 

‘गोकुळ’चे नवे दरपत्रक
गाय    जुना दर    नवा दर 
खरेदी    23    25
विक्री    43    45
म्हैस     जुना दर    नवा दर 
खरेदी    40.90    42
विक्री     50    52
कोल्हापूरबाहेर     54    56
(आकडे रुपयांत)