Wed, May 22, 2019 16:19होमपेज › Kolhapur › गांधीनगर पाणी योजना बंद; 13 गावांना फटका

गांधीनगर पाणी योजना बंद; 13 गावांना फटका

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 09 2018 12:26AMउजळाईवाडी : प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रादेशिक गांधीनगर पाणी योजना पाच दिवसांसाठी बंद केल्याने गांधीनगरसह तेरा गावांना पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. 
मुळात 2004 च्या सुमारास उजळाईवाडी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, उचगाव, वळीवडे, गडमुडशिंगी, नेर्ली, तामगाव, कणेरी, कणेरीवाडी, विकासवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव या गावांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही मूलभूत स्रोत नसल्याने महाराष्ट्र प्राधिकरणाकडून गांधीनगर प्रादेशिक नळ योजना राबविण्यात आली.

काही गावांनी थोड्या प्रमाणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आधार घेतला, तर काही गावांत मूळ असलेल्या गाव विहिरी अजूनही चालू आहेत. यातून पाणीपुरवठा गावासाठी करण्यात येत आहेत, तर काही गावांची मानसिकता अजूनही प्राधिकरणाचे पाणी घेण्याची नाही. ही वस्तूस्थिती आहे. परंतु, उजळाईवाडी  याला अपवाद आहे. संपूर्ण गावच या प्राधिकरणाच्या योजनेवर अवलंबून आहे. त्यामुळे वाढत्या नागरिकरणामुळे उजळाईवाडीला एक दिवसा आड पाणी देऊन ही मुबलक पाणी मिळत नाही. पाणी बंद झाल्याने तर नागरिकांचा संपूर्ण दिनक्रमच बदलला आहे.

कणेरीवाडीजवळ या योजनेच्या पाईपमधील रबररिंग खराब झाल्याने गुरुत्ववाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यासाठी मंगळवारपासून शनिवार (दि. 12) पर्यंत प्राधिकरणाने पाणीपुरवठा बंद केला आहे. यातच कागल दूधगंगेतून हे पाणी उपसा केला जातो. त्यात सिमेंट पाईप असल्याने अनेक ठिकाणी गळती लागली आहे. ही गळती बंद करणे अनिवार्य असल्याने प्राधिकरणाकडून पाच दिवस पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Tags : kolhapur, Gandhinagar, water scheme