Wed, Nov 14, 2018 20:54



होमपेज › Kolhapur › स्वातंत्र्य सैनिकांना ५० घरे मोफत

स्वातंत्र्य सैनिकांना ५० घरे मोफत

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 12:27AM



कोल्हापूर: प्रतिनिधी

कोल्हापूर शहराजवळ स्वस्तातील 250 घरांचा प्रकल्प उभारला जाईल, त्यापैकी 50 घरे स्वातंत्र्य सैनिकांना मोफत दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विकासाला पैशाची कमतरता नाही, राज्याची तसेच जिल्ह्याची प्रगतीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच समाजात सकारात्मक विचाराची सुरुवात होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेे. यावेळी उपस्थित शाहू महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर शोभा बोंद्रे, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना पालकमंत्री पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात विकास कामांना पैसा कमी पडणार नाही. राज्यात जीएसटीमुळे गेल्यावर्षी 43 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीमुळे 3 हजार कोटींचे उत्पन्न वाढले आहे. तसेच मुद्रांक  विभागामार्फत यंदा 26 हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 हजार कोटींनी उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे विकासाला पैसा पुरेसा आहे; मात्र जनतेने सकारात्मक मानसिकता जोपासणे गरजेचे आहे. 

राज्यात 5 हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग होते ते आता 22 हजार कि.मी.चे होतील, ते अधिक दर्जेदार बनविण्याच्या कामास प्राधान्य दिले आहे. राज्याला केंद्राकडून 1 लाख 6 हजार कोटी रुपये मिळाले असून या निधीतून 1-2 वर्षात रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील असे सांगत ते म्हणाले, नव्याने 6 हजार कोटींचे रस्ते हाती घेतले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 10 हजार कि.मी.च्या 3 पदरी, 4 पदरी तसेच 6 पदरी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात 2 हजार 32 कोटी रुपयांचे 870 कामे सुरू केली आहेत. मागील तीन वर्षांत 698 कोटी 73 लाखांच्या निधीतून जवळपास 794 कि.मी.च्या रस्त्यांची कामे केली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेततून 30 हजार कि.मी.चे रस्ते चांगले केले आहेत. पुढील वर्षापर्यंत आणखीन 20 हजार कि.मी.चे रस्ते चांगले केल्यानंतर या 5 वर्षांत 50 हजार कि.मी.चे रस्ते चांगले होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न असून, 18 टक्के असणारे सिंचनाखालील क्षेत्र 40 टक्क्यांपर्यंत नेण्यास प्राधान्य दिले आहे. केंद्र शासनाकडून 14 हजार कोटींचा निधी कर्ज रूपाने मिळाल्याने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ धरण प्रकल्प यामुळे मार्गी लागतील, असा विश्‍वास व्यक्त करून ते म्हणाले, गावागावांत जलसाठे निर्माण करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवले. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 107 गावांमध्ये 48 कोटी 76 लाख रुपये खर्चुन 1 हजार 859 कामे पूर्ण करून 7 हजारांवर टीसीएम पाणीसाठा निर्माण केला आहे. जिल्ह्यातील 1 लाख 96 हजार 113 शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानापोठी 414 कोटी रुपये दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील 43 हजार गावांतील ऑनलाईन सात-बाराचे काम पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, नजीकच्या काळात नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा डिजिटल  सात-बारा घरबसल्या जनतेस उपलब्ध होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात 32 लाख 38 हजार झाडे लावण्यात आली असून, झाडे जगण्याचे प्रमाणही 85 टक्क्यांपर्यंत असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन व तिर्थक्षेत्राच्या  ठिकाणी पर्यटकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत नवदुर्गा उत्सव, फ्लॉवर फेस्टिव्हल, आडवाटेवचं कोल्हापूर असे उपक्रम राबविले असून श्रावण महिन्यात आठवड्यातील मंगळवार व शुक्रवारी  जिल्ह्यातील सहा धार्मिक स्थळांची धार्मिक यात्रा काढून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत दर्शन घडविले जाईल. 

कोल्हापूर शहराजवळ 250 घरांची योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल, अशी घोषणा करून ते म्हणाले,  शहरापासून अवघ्या 5 किलो मीटर अंतरावर 250 घरांचा प्रकल्प हाती घेतला असून, 500 स्न्वेअर फूटचे घर केवळ 1500 रुपये स्न्वेअर फूट दराने उपलब्ध करून दिले जाणार असून यामध्ये खेळाडू, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पातील 50 घरे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदणी असणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना मोफत उपलब्ध करून दिली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

यावेळी शहीद जवान हवालदार अनंत जानबा धुरी यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाखांची आर्थिक मदत पाटील यांच्या हस्ते  देण्यात आली. तसेच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झालेले सहायक फौजदार दत्तात्रय बाबुराव मासाळ आणि पोलिस हवालदार वसंत शंकर पन्हाळकर यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवल्याबद्दल सिद्धेश श्रीकांत कळेकर या विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमधील राज्य गुणवत्ता यादीत गुणवत्ता प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विराज अमृत कुरांडे, अद्वैत अरुण हळदकर, अर्थव बाबुराव चौगुले, रिची ऋतुराज यादव, रसिका रामदास वारके, श्रेया आशिष कांबळे या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तसेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत परिणीती प्रकाश शेलार हिच्या पालकांना 50 हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. 

कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, संदीप देसाई तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलिस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. आभार नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी मानले. सूत्रसंचालन सोनार यांनी केले.