Fri, Apr 19, 2019 08:18होमपेज › Kolhapur › चौघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

चौघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर: प्रतिनिधी

शिंगणापूरच्या मुळे कॉलनीतील ओपन स्पेसवर प्लॉट पाडून परस्पर विक्री केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकार्‍यांसह चौघांना दोषी ठरवण्यात आले आहे. करवीर गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी चौकशी अहवाल जि.प. कडे सादर केला असून यासंदर्भात आता पुढील कारवाई म्हणून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येत आहे. सात दिवसांनी नोटिसीचा खुलासा आल्यानंतर ग्रामसेवकाचे निलंबन तर सरपंचावरील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे. 

शिंगणापूर येथील मुळे कॉलनीतील ओपन स्पेस जागेच्या मूळ मालकाने कागदपत्रात फेरफार करून परस्पर विक्री केल्याची तक्रार कॉलनीतील रहिवाशांनी जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली होती. त्यानुसार जि.प. ने करवीर गटविकास अधिकार्‍यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार गटविकास अधिकार्‍यांनी हा अहवाल ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात अशाप्रकारे ओपन स्पेस हडप केल्याचे सिद्ध झाले असून यात सरपंच वीणाताई पाटील, ग्रामविकास अधिकारी के. पी. खाडे यांच्यासह ठरावाला सूचक व अनुमोदक राहिलेल्या महेश पाटील व किरण पाटील यांना दोषी धरण्यात आले आहे.

मुळे कॉलनीत 1986 साली 87 गुंठे जागा सुरेश पाटील व बाबुराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने एनए करून घेतली. यात 26 फ्लॉट पाडून त्याची विक्रीही करण्यात आली. 1990 नंतर सर्व प्लॉटमध्ये घरेही बांधली गेली. त्यावेळी 9 हजार 474 चौरस फूट जागा ओपन स्पेस असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनीच जाहीर केले; पण ती जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करण्याबाबत जागा मालक असलेल्या पाटील यांनी कोणतीही कार्यवाही केली 

नाही. दरम्यान, याचाच गैरफायदा घेऊन या रिकाम्या जागेवरही प्लॉट पाडून त्याची विक्री सुरू झाली. याबाबत कॉलनीतील पांडुरंग बंडकर व संदीप रोटे यांनी तक्रार केली, पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेवटी या दोघांनी जि.प. सीईओ डॉ. खेमनार यांच्याकडे धाव घेतली. यानंतर हे प्रकरण धसास लागले असून ओपन स्पेसवरील अतिक्रमण व विक्री ही बेकायदेशीर असल्याने कारवाई सुरू झाली आहे.