Sat, May 30, 2020 10:02होमपेज › Kolhapur › सतेज पाटील हे चुलीत पाणी ओतणारे नाहीत

सतेज पाटील हे चुलीत पाणी ओतणारे नाहीत

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आमचे नेते आमदार सतेज पाटील हे कुणाच्या चुलीत पाणी ओतणारे नाहीत. मेरी वेदर ग्राऊंडची प्रचंड दुरवस्था होत असल्याने खेळाडूंच्या मागणीनुसारच ते ग्राऊंड खेळाव्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव भाड्याने देऊ नये, असा ठराव महासभेत झाला आहे. त्याला विरोधी पक्षनेता ताराराणी आघाडीचे किरण शिराळे, गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी अनुमोदक आहेत. त्यामुळे महापालिकेतील ठरावाला काही किंमत आहे की नाही? परिणामी राजकीय द्वेषापोटी कृषी प्रदर्शनाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नाही, असे माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले, मागील वर्षापासूनच मेरी वेदर ग्राऊंड खेळाव्यतिरिक्त इतर कारणासाठी देऊ नये, असा ठराव होणार होता. परंतु, खासदार धनंजय महाडिक यांचे कृषी प्रदर्शन भरणार असल्याचे सांगून यंदाच्या वर्षी मुदत द्यावी, पुढील वर्षी इतरत्र भरवू, अशी ग्वाही ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांचेही सतेज कृषी प्रदर्शन कोल्हापूर शहरात झाले. त्यांनीही प्रदर्शनासाठी 17 जुलै 2017 ला महापालिकेकडे परवानगी मागितली होती. परंतु, खेळाव्यतिरिक्त इतर कारणासाठी मैदान दिले जात नसल्याचे कळविल्यावर तपोवन मैदानावर प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार पाटील यांच्यावर कुणी टीका करू नये. 

कुणी कुणाच्या जागा बळकावल्या आहेत ते कोल्हापूर शहराला चांगलेच माहिती आहे. तसेच खेळाडूंच्या खेळाला विरोध केला जात असल्याने कोण मनोरुग्ण आहे ते लोकच सांगतील. लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या ठरावाचे पालन करावे. खेळांडूचा विचार करून प्रदर्शनाचे ठिकाण बदलावे, असेही माने यांनी सांगितले.