Fri, Jul 19, 2019 05:30होमपेज › Kolhapur › पोटनियम दुरुस्तीवरून शेतकरी संघाच्या सभेत गोंधळ 

पोटनियम दुरुस्तीवरून शेतकरी संघाच्या सभेत गोंधळ 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शेतकरी संघाची निवडणूक लढविण्यासाठी पोटनियमात दुरुस्तीवरून संघाच्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ उडाला. त्यामुळे अध्यक्ष युवराज पाटील यांनी संघाची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती व संस्थेची शेअर्स वर्गणी 25 हजारांऐवजी 15 हजार आणि संघाच्या शाखेतून व्यक्तीने प्रतिवर्षाला 25 हजारांची खरेदी करणे व संस्थेने प्रतिवर्षी 1 लाखाचा माल खरेदी करणे असा बदल केला जाईल, असे सांगितले. यावेळी मंजूर-मंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणले होते.

 संघाची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी शाहू स्मारक भवनमध्ये झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील  होते. यावेळी  अध्यक्ष पाटील म्हणाले,  विद्यमान संचालक मंडळ सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली आहेत. संघावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही. स्वभांडवलावर संघाची वाटचाल सुरू आहे. यावर्षी संघाला 1 कोटी 40 लाखांचा नफा झाला आहे, त्यामुळे सभासदांना 13 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. पुढील वर्षी 14 टक्के आणि त्याच्या पुढीलवर्षी 15 टक्के लाभांश दिला जाईल, असे सांगितले. संघाचे भागभांडवल वाढावे म्हणून निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांसाठी शेअर्स वर्गणी वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. हा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता; पण ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कदम यांनी 25 हजारांवरून 15 हजार शेअर्स वर्गणी करा, अशी सूचना केली. त्यामुळे पोटनियमाच्या रकमेत बदल करण्यात येत आहे. 

 माजी संचालक अजित मोहिते यांनी हरकत घेत, संघ हा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आहे. भविष्यात सामान्य सभासद संघाचा संचालक झाला पाहिजे, त्यामुळे शेअर्स वर्गणी वाढविण्यात येऊ नये, अशी मागणी केली, यावर अध्यक्ष पाटील यांनी संस्थांना संघातून माल न्यावयाचा नाही. मात्र, संस्था गटातून उमेदवारी तेवढी पाहिजे काय, असा जबाब विचारला, यावर गोंधळ सुरू झाला, सभासदांनी उठून मंजूर-मंजूरच्या घोषणा देणे सुरू केले. या गोंधळाच पोटनियमातील बदलास मंजुरी देण्यात आली. 

 जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, संघाचे आर्थिक परिस्थिती आणि भागभांडवल वाढण्यासाठी हा बदल केला जात आहे. संघाची निवडणूक लढवण्यार्‍यांसाठी शेअर्स वर्गणी वाढवलीच पाहिजे. सर्जेराव देसाई म्हणाले, संघाची निवडणूक लढविणार्‍यांसाठी पोटनियम दुरुस्ती आहे, इतरांसाठी नाही. त्यामुळे इतरांच्या शेअर्स वर्गणीत वाढ होणार नाही. 

शेतकरी संघाच्या शेअर्स वर्गणीत वाढ ही नवीन बाब नाही, यापूर्वी संघाचे कार्यकारी संचालक पद हे सभासदांतून निवडून दिले जात होते. या पदाची निवडणूक लढविण्यासाठी शेअर्स वर्गणी 10 हजार हवी, अशी अट होती, खरेदीची अट नव्हती. पण सहकार कायद्यात बदल झाल्यामुळे कार्यकारी संचालक पद रद्द झाले. जुन्या नियमातच थोडा बदल करून संघाच्या संचालक मंडळाने व्यक्ती आणि संस्था गटातून निवडणूक लढविण्यासाठी 15 हजार शेअर्स वर्गणी. 25 हजारांची खरेदी व्यक्ती गटासाठी आणि संस्थेसाठी 1 लाखाची खरेदीची अट घालण्यात आली आहे, असे संघाचे व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनी सांगितले..

 आभार उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मानले. यावेळी गूळ उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. सभेला संचालक शिवाजीराव कदम, आण्णाप्पा चौगुले, मानसिंगराव जाधव, यशवंत पाटील, अमरसिंह माने, शशिकांत पाटील, व्यंकप्पा भोसले, बाळकृष्ण भोपळे, विजयकुमार चौगले, जी. डी. पाटील, एम. एम. पाटील, विनोद पाटील, संचालिका श्रीमती शोभना शिंदे, श्रीमती विजयादेवी राणे, श्रीमती सुमित्रादेवी शिंदे, आदी उपस्थित होते.