होमपेज › Kolhapur › सेक्स रॅकेट माध्यमातून अमली पदार्थांचा फैलाव!

सेक्स रॅकेट माध्यमातून अमली पदार्थांचा फैलाव!

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:27AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

आजकाल कोल्हापूर शहरात, काही उपनगरांमध्ये आणि राष्ट्रीय महामार्गाच्या आजुबाजूच्या परिसरात छुपा वेश्या व्यवसाय करणार्‍या बहुतांश कॉलगर्ल या परराज्यातून आलेल्या आहेत. यापैकी बहुतेकींना कोणत्या ना कोणत्या तरी नशिल्या पदार्थांचे व्यसन आहे. त्यामुळे या सेक्स रॅकेटच्या माध्यमातून शहर आणि परिसरात वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या व्यसनांचा फैलाव दिसत आहे.

कोल्हापूर शहर आणि या परिसरात आलेल्या अनेक कॉलगर्लना दारूसह वेगवेगळ्या नशिल्या पदार्थांची व्यसने आहेत. या कॉलगर्लना तशा स्वरूपाच्या नशिल्या पदार्थांचा पुरवठा करणारेही एक रॅकेट आहे. फक्त या कॉलगर्लनाच या अमली पदार्थांची व्यसने आहेत अशातला भाग नाही, तर कामोत्तेजना वाढविण्यासाठी म्हणून काही आंबटशौकीन ग्राहकही या घातक व्यसनांच्या आहारी गेले आहेत. एकूणच कोल्हापूर परिसरातील कॉलगर्ल सेक्स रॅकेट हे आता नुसते सेक्स रॅकेट राहिलेले नाही तर अमली पदार्थांच्या प्रसाराचेही फार मोठे जाळे बनत चालले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये फसलेले अनेक युवक वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थांच्या व्यसनांमुळे देशोधडीला लागत आहेत. या  रॅकेटचे नेहमीचे ग्राहक बनलेले  युवक कालांतराने या व्यसनांचे शिकार ठरताना दिसत आहेत. 

या सेक्स रॅकेटच्या आडून छुपी गुन्हेगारीही सुरू आहे. नवखा ग्राहक जाळ्यात फसला की ‘चला माझ्या घरीच जाऊ, घरी कोणीच नाही’, असे सांगून कॉलगर्ल संबंधित ग्राहकाला ती राहत असलेल्याफ्लॅटवर आणते. जरा कुठे चाळे चालू झाले की त्याच कॉलगर्लचा दलाल तिचा नवरा म्हणून समोर उभा ठाकतो. नवखा माणूस घरात बसल्याचे बघून चिडल्याचे नाटक करतो, संबंधित कॉलगर्लही हा माणूस जबरदस्तीने घरात घुसल्याचा कांगावा करतो, मग थोडी हातापाया होऊन संबंधित ग्राहकाला पोलिस ठाण्यात नेण्याची तयारी सुरू होते. आता अब्रूचं खोबरं होणार म्हणून धास्तावलेला तो ग्राहक हातापाया पडू लागला की पोलिस ठाण्यात न जाण्याच्या बदल्यात त्या ग्राहकाकडे असतील नसतील तेवढ्या किमती वस्तू, मोबाईल, घड्याळ, सोन्याची चेन, अंगठ्या, रोख रक्कम आदी काढून घेऊन हाकलून लावले जाते. आलेला अनुभव अक्कलखाती जमा करून हात चोळत ग्राहक आल्यापावली पोबारा करतो. वेश्या व्यवसायाच्या जोडीने या कॉलगर्लनी अलीकडे हा जोडधंदाही सुरू केला आहे. या माध्यमातून आजपर्यंत अय्याशीच्या नादाला लागलेल्या अनेकांनी लाखो रुपये गमावून कपाळावर हात मारून घेतला आहे.