Fri, Nov 24, 2017 20:15होमपेज › Kolhapur › आता उत्पन्न लपवायचं नाही!

आता उत्पन्न लपवायचं नाही!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील

राहतो बंगल्यात. दारात चार वाहने. शेती, व्यवसाय आणि जोडीला पोरांना गलेलठ्ठ पगार; पण कोणत्याही कारणासाठी उत्पन्न दाखवायची वेळ आली, तर मात्र वर्षाला पंचवीस हजारांच्या पुढे मिळकतच नसल्याचा दाखला तलाठ्याकडून घ्यायचा आणि जोडायचा. आतापर्यंत सुरू असलेले हे अनेकांचे गुपित आता उघडे पडणार आहे. कारण, यापुढे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे स्वयंघोषणापत्र असणार आहे. या घोषणापत्रात खोटी माहिती आढळली, तर मी फौजदारीसंहितेच्या कलम 199, 200 कलमानुसार होणार्‍या शिक्षेस पात्र राहीन, असे लिहून द्यावे लागणार आहे.31 मार्च 2012 च्या शासन निर्णयानुसार अर्जाचा नमुना असे नमूद केलेले हे घोषणापत्र आहे.

अर्जामध्ये कुटुंबातील व्यक्तींचा तपशील, उत्पन्नाची साधने उदा., शेती, पूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेतमजुरी, उद्योगधंदा, स्थावर मिळकत, नोकरी वेतन, सेवानिवृत्ती वेतन, मानधन, इतर उत्पन्न असे रकाने आहेत. या रकान्यांत संबंधित वर्षातील उत्पन्नाचा तपशील लिहून द्यायचा आहे. उत्पन्नाच्या तपशिलाचे पुरावेही अर्जासोबत जोडावयाचे आहेत. या अर्जातच ही माहिती खरी असल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र द्यायचे आहे. तसेच संबंधित तलाठ्याने अर्जदाराच्या उत्पन्नाची चौकशी करून मिळकतीचा चौकशी अहवाल द्यायचा आहे.