Mon, Jun 17, 2019 02:54होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : 'मुश्रीफ, ए.वाय.ना बांगड्यांचा आहेर द्या'

कोल्हापूर : 'मुश्रीफ, ए.वाय.ना बांगड्यांचा आहेर द्या'

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 2:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काळे फासायचे व बांगड्यांचा आहेर द्यायची एवढी हौस असेल, तर त्याची सुरुवात बिद्री कारखान्याची सत्ता टिकविण्यासाठी भाजपबरोबर युती करणार्‍या आ. हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यापासून करावी. हिंमत असेल तर खा. धनंजय महाडिक यांना काळे फासून दाखवावे, असे आव्हान नगरसेवक अफजल पिरजादे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. मला काळे फासण्याचा किंवा बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला जुना बुधवार पेठेच्या भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कृती समितीच्या माध्यमातून ज्यांची कृती सर्व कोल्हापूर शहराला माहिती आहे, त्या आर. के. पोवार यांनी माझा आर्थिक हव्यास काढू नये. प्रत्येक स्थायी समिती सभापतींकडून किती पाकिटे मिळाली, याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी.

लाटकरना स्मृतिभ्रंश
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांना स्मृतिभ्रंश झाला आहे, असे वाटते. त्यांनी ज्यांना भिकारडे अशी उपमा दिली आहे, त्यांनीच लाटकर यांच्या पोटनिवडणुकीत आर्थिक मदत केली होती. राष्ट्रवादीच्या दारात मी तिकीट मागण्यासाठी गेलो नव्हतो. त्यांनी विरोधकांकडून पैसे घेऊन विरोधात प्रचार केला. त्यांच्याकडून अगोदर पदाचा राजीनामा घ्यावा. निवडणुकीत राष्ट्रवादीचे 27 नगरसेवक निवडून येण्याची शक्यता असताना फक्त 15 नगरसेवक कसे आले याचे स्पष्टीकरण द्यावे, असे पत्रकात म्हटले आहे.

आदिल फरास सूर्याजी पिसाळ
आम्हाला सूर्याजी पिसाळाची उपमा देणार्‍या कोल्हापूर महापालिकेतील लुटारू आदिल फरास हेच महमद गजनीचे अवतार आहेत. राजू लाटकर यांच्या पोटनिवडणुकीत फरास यांनीच सूर्याजी पिसाळाची भूमिका पार पाडली. गरीब खोकीधारक व्यावसायिकांकडून फरास हे किती पैसे उकळतात, याची माहिती जाहीर करावी. असा यांचा कुठला व्यवसाय आहे की ज्यामुळे आर्थिक सुबत्ता त्यांच्या पायाशी लोळण घेते, याची ‘ईडी’मार्फत चौकशी व्हावी, असे पत्रकात म्हटले आहे.

माझ्या स्थायी सभापतिपदासाठी प्रयत्न करणार्‍या प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, डॉ. संदीप नेजदार, अर्जुन माने, धीरज पाटील, महेश उत्तुरे यांचा मी आभारी आहे. राष्ट्रवादीमधील काही जण जयंत पाटील यांचा या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु त्यांचा माझ्या निर्णयाशी काहीही संबंध नसून, तो माझा वैयक्तिक निर्णय आहे, असेही पिरजादे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अधिकार्‍यांवर धावून जाणार्‍या जाधवांची प्रतिष्ठा काय?
नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी आमची सामाजिक प्रतिष्ठा काढू नये. जो माणूस स्वतःच्या जावयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अंगावर धावून जातो, त्याची सामाजिक प्रतिष्ठा काय? सभागृहाचा मान राखायचा असेल, तर जाधव यांनी मोबाईलवरून क्रिकेट बेटिंग घेणे बंद करावे, असे पत्रकात म्हटले आहे.