होमपेज › Kolhapur › 'काँग्रेसला सत्ता मिळू नये म्हणून युतीसाठी भाजप अगतिक'

'काँग्रेसला सत्ता मिळू नये म्हणून युतीसाठी भाजप अगतिक'

Published On: May 26 2018 7:59PM | Last Updated: May 26 2018 7:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही, तर काँग्रेस विजयी होईल, असे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. सर्वसामान्यांच्या आणि राज्याच्या हितासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे अधिक गरजेचे असून, त्यासाठीच शिवसेनेबरोबरच्या युतीसाठी भाजप अगतिक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मैत्रीत चुकीचे राजकारण केल्याचा ठपका ना. पाटील यांनी ठेवला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात युतीचे सरकार आल्यापासून अनेक चांगले निर्णय घेतले गेल्याचे सांगून ना. पाटील म्हणाले की, सरकारची सध्याची धोरणे अपूर्ण राहू नयेत म्हणून 2019 ला पुन्हा सत्ता येणे आवश्यक आहे. युती झाली नाही, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. आम्ही युतीसाठी जाहीरपणे बोलत आहोत; पण जर युती झाली नाहीच, तर शिवसेनेला त्यांचा मार्ग मोकळाच असेल.

पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामणी वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर लागलेल्या पोटनिवडणुकीत वनगा यांचे चिरंजीव की सून यांना उमेदवारी देण्याबाबत विचारविनिमय सुरू असतानाच शिवसेनेने त्यांच्या चिरंजीवांचा आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सेनेने वनगा यांचे चिरंजीव आणि पत्नी या दोघांना अज्ञातस्थळी हलविले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर प्रश्‍न सुटला असता; पण एकूणच ठाकरे यांनी चुकीचे राजकारण केले, असा आरोप ना. पाटील यांनी केला.

युती आणि मैत्रीत बाळासाहेब ठाकरे नेहमी विचारविनिमय करून निर्णय घेत असत, आता मात्र ती परंपरा पाळली जात नाही. ज्या घरात 40 वर्षे खासदार आणि आमदार पदे होती, त्याची जाणीव वनगा यांच्या चिरंजीवांनी ठेवायला हवी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी आश्रमात कै. वनगांचे शिक्षण झाले होते. म्हणून ते भाजपशी एकनिष्ठ होते; पण चिरंजीवांनी ती जाणीव ठेवली नाही, असा आरोप ना. पाटील यांनी केला.
कर्नाटकमध्ये 38 आमदारांच्या निजदचा मुख्यमंत्री होणे हा मतदारांचा अपमान असल्याचे सांगून ना. पाटील म्हणाले की, घोडेबाजारामुळेच हे शक्य झाले. भाजपची चार आमदारांबरोबर चर्चा सुरू असताना माध्यमांनी घोडेबाजाराचा विषय उचलून धरला; पण 38 आमदारांच्या पक्षाला काँग्रेसच्या 78 आमदारांनी पाठिंबा दिला, हे घोडेबाजाराशिवाय कसे शक्य आहे! मंत्रिपदापासून आणखी कशाकशाची ऑफर दिली गेली, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

आपल्यातील राक्षस जागाच

कोल्हापूरच्या महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर ना. पाटील यांना तुमच्यातील राक्षस शांत झाला काय, असा प्रश्‍न विचारता ते म्हणाले की, राक्षस अजून जागाच आहे. केवळ बोटांचे कलम केले, तर आ. सतेज पाटील निपचित पडले. मोठी शस्त्रक्रिया केली तर काय अवस्था होईल, याचा विचार करा. तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटाव प्रकरणातून ना. पाटील व आ. पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. तेव्हा झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर ना. पाटील यांनी आपल्यातील राक्षस जागा झाला असल्याचा इशारा दिला होता. मध्यंतरी ना. पाटील व आ. पाटील यांच्यातील शाब्दिक चकमक थांबली. महापौर निवडीत पुन्हा काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आल्याने वातावरण तापेल काय, अशी चर्चा होती.