Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Kolhapur › जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून नेमणुकीस असणारे दिनकर कांबळे यांचा दोन महिन्यांचा थकीत पगार काढण्यासाठी बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच मागणारा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. अमर आनंदा सुतार (वय 40, रा. शिरगाव, राधानगरी) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. यापूर्वी त्याने 10 हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

दिनकर कांबळे हे यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे नेमणुकीस होते. त्यांचा फेबु्रवारी व मार्च या दोन महिन्यांचा पगार थकीत होता. तो पगार काढण्यासाठी ते लिपिक अमर सुतारला भेटले. यावेळी अमर सुतारने 15 हजार रुपयांची मागणी केली. कांबळे यांनी सुतारला 10 हजार रुपये दिले; पण यानंतरही पगार होण्यास विलंब होत असल्याने त्यांनी सुतारकडे विचारणा केली. यावेळी सुतारने आणखी पाच हजार रुपये बक्षिसापोटी द्यावे लागतील, असे बजावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लाचेची रक्‍कम द्यायची नसल्याने कांबळेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी लावलेल्या सापळ्यावेळी सुतारने रक्‍कम स्वीकारली नाही. मात्र, त्याने मागणी केल्याचे तपासात सिद्ध झाल्याने गुरुवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण पाटील, शामसुंदर बुचडे, शरद पोरे, संदीप पावलेकर, नवनाथ कदम, रुपेश माने यांनी कारवाईत सहभाग घेतला. 
घरझडती रात्री उशिरापर्यंत सहायक फौजदार मनोहर खणगावकर यांच्या पथकाकडून शिरगाव येथील सुतारच्या घराची झडती सुरू होती. पथकात कृष्णात पाटील, संग्राम पाटील, छाया पाटोळे यांचा सहभाग होता.