Wed, Mar 27, 2019 04:13होमपेज › Kolhapur › केंद्रीय पर्यटनमंत्री आज रायगडावर

केंद्रीय पर्यटनमंत्री आज रायगडावर

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची राजधानी असणार्‍या रायगडाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स शनिवार, दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता येणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांच्या पुढाकाराने केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचा दौरा प्रथमच रायगडावर होत आहे. 

रायगडावर 6 जून रोजी साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सव आणि राष्ट्रीय सणाचा दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने संभाजीराजे यांनी गेल्या दहा वर्षांपासून परिश्रम घेतले. याची दखल घेत राज्य शासनाने रायगड विकास प्राधिकरणाची घोषणा केली. रायगडाच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘रायगड विकास प्राधिकरण’ निर्माण केले. इतकेच नव्हे तर छत्रपती घराण्यातील प्रतिनिधी असणार्‍या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. 

प्राधिकरणाच्या वतीने सद्या रायगडावर उत्खननासह विविध  कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी करण्याबरोबरच मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी खा. संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांना निमंत्रित केले. त्यानुसार ते  दौर्‍यावर आले आहेत. यावेळी अल्फोन्स यांच्याकडून रायगडाच्या भौतिक विकासासह पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबतचे मोलाचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.