Wed, Jul 17, 2019 08:15होमपेज › Kolhapur › गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ‘सीपीआर’ ठरतेय अव्वल

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ‘सीपीआर’ ठरतेय अव्वल

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:12AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे सर्वसामान्यांचे आधारवड आहे. तज्ज्ञ डॉक्टर व माफक दरात उपचारामुळे रुग्णालयाचा लौकिकात तर भर पडलीच आहे, शिवाय गुतागुंतीच्या शस्त्रक्रियेत हे रुग्णालय अव्वल ठरत आहे. डॉक्टरांवरील दृढ विश्‍वासामुळे  दिवसेंदिवस येथे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. 800 वरून थेट 1200 पर्यंत बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या पोहोचली आहे. रुग्णालयात उपलब्ध साधनद्वारे रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येथील डॉक्टरांचा हातखंडा आहे. जानेवारी ते नोव्हेंबरअखेर रुग्णालयात गुंतागुंतीच्या 7650, किरकोळ गुंतागुंतीच्या 6815 तर छोट्या 8552 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहे. 

सीपीआरमध्ये स्त्रीरोग, हृदय रोग, नेत्र विभाग, क्षयरोग विभाग, बालरोग विभाग, नाक-कान-घास विभाग, ट्रॉमा केंअर सेंटर, स्त्री व पुरुष वार्ड, डायलेसीस विभागासह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे साधनसामुग्रीची कमतरता भासत आहे. उपलब्ध साधनाद्वारे रुग्णांना जीवदान येथील डॉक्टर आणि कर्मचारी देत आहे. आरोग्य मंत्री, पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी रुग्णालयासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाइकांतून होत आहे. दररोज येथील शस्त्रक्रिया विभागात छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होतात. त्यामध्ये आठवड्याला एक-दोन गुतांगुतींच्या असतात. 

सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सिंधुदुर्ग, बेळगाव येथील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. यामध्ये अपघात, प्रसूती, हृदयरोग, सर्पदंश या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात कोठेही अपघात घडल्यास रुग्णांना उपचारासाठी सीपीआरमध्येच दाखल केले जाते.पण येथे स्ट्रेचर, कॉट,बेडसीट,चादरी, औषधे ठेवण्याचे टेबल, खुर्च्या, बसण्यासाठीची बाकडी आदींची कमतरता आहे. उपलब्ध होणारा निधी आणि रुग्णांसाठी लागणारे साहित्य खरेदी करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोल्हापूरची आरोग्य वाहिनी असणार्‍या सीपीआरसाठी भरीव निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. 

सीपीआर प्रशासनाने जिल्ह्यातील संघटना, सामाजिक संस्था, तरुण मंडळे आणि दानशूर व्यक्तींना देखील वाढदिवस आणि समारंभातील अनाठायी खर्च टाळून सीपीआरला वस्तू स्वरूपात मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे रुग्णालयास 125 कॉट, लोखंडी टेबल, चप्पल ठेवण्याचे स्टँड आणि शस्त्रक्रियेसाठी छोटी-मोठी उपकरणे देखील भेट स्वरूपात जमा होत आहेत.