Thu, May 23, 2019 20:27
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये रेबीज लसीकरणाचे रेकॉर्ड

सीपीआरमध्ये रेबीज लसीकरणाचे रेकॉर्ड

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 12:49AMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

जिल्ह्यात रेबीजमुळे दोन महिन्यांत पाच जणांचा बळी गेल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभरात 250 रुग्णांनी रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली.सीपीआरमध्ये लस टोचून घेण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. सीपीआर प्रशासनाने रेबीज लसीचा मुबलक साठा ठेवला असला, तरी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात मात्र रेबीजची लसच नाही. याचा भार सीपीआरवर पडू लागला आहे.

जिल्ह्यात  गेल्या दोन महिन्यांपासून रेबीजचा फैलाव वाढला आहे. डिसेंबर महिन्यात सर्वेश पार्कातील एका चिमुरड्याचा रेबीजमुळे नाहक जीव गेला होता. त्यानंतर कोल्हापूर शहरातील दोघांचा व ग्रामीण भागातील एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाच धास्तावला आहे. रेबीज हा रोग फक्‍त कुत्रा चावल्याने होतो, असा नागरिकांचा समज आहे; पण गेल्या पंधरा दिवसांपासून प्रसार माध्यमांनी जनजागृती केल्याने नागरिक सावध झाले आहेत. कुत्रा, मांजर, कोल्हा, माकड, वटवाघूळ चावल्याने रेबीज होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्राण्याने चावा घेतल्यास नागरिकांनी त्वरित रेबीजची लस टोचून घेत आहेत. 

सीपीआरमध्ये दररोज 20 ते 25 रुग्ण रेबीज प्रतिबंध लस घेण्यासाठी येत होते; पण गेल्या दहा दिवसांपासून 70 ते 80 रुग्ण दररोज दाखल होत आहेत. आतापर्यंत सीपीआर रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लसीचा रुग्णांचा 90 हा सर्वोच्च  आकडा होता. मंगळवारी दिवसभरात 250रुग्णांनी रेबीजची लस टोचून घेतल्याने ही आतापर्यंतची  सर्वाधिक रेबीज लसीकरणाची नोंद आहे. यामध्ये शहरातील रुग्णांचा अधिक समावेश आहे. महापालिकेच्या रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने सीपीआरला याचा भार सोसावा लागत आहे. 

रेबीज प्रतिबंधक लसीचा मुबलक साठा 
रेबीज प्रतिबंधक लसीचा मुबलक साठा सीपीआरमध्ये उपलब्ध आहे. नागरिकांनी रेबीजबाबत सावध राहणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देऊन कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवावे. यांच्या लाळेच्या संपर्कात येऊ देऊ नये. जर या प्राण्यांनी चावा घेतला असेल, तर त्वरित रेबीज प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असे आवाहन सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.