Wed, Sep 26, 2018 12:14होमपेज › Kolhapur › बायोमेट्रिक कार्ड होणार बाद

बायोमेट्रिक कार्ड होणार बाद

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:27AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

 राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या  बायोमेट्रिक कार्डवर अपुरी माहिती असल्याने सध्या फेरीवाल्यांकडे असणारी अंदाजे पाच हजारांहून अधिक बायोमेट्रिक कार्ड  बाद होणार आहेत. नवीन फेरीवाला धोरणानुसार त्यांना बायोमेट्रिक कार्ड दिले जाणार असून यामुळे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर चाप बसणार आहे. 

 राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी वारंवार मागणी करूनही या धोरणाची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे मिळेल ती जागा धरून लोकप्रतिनिधींच्या नावावर अनेक ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरूच होते. महापालिकेने अशा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. पण पुन्हा त्याच  ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांच्या टपर्‍या रातोरात उभारतात.

 2012 साली महापालिकेने फेरीवाल्यांचा सर्व्हे करून नंतर  बायोमेट्रिक कार्ड दिले गेले.  यावेळी दहा हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे झाला. यापैकी  आठ हजार फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्डसाठी अर्ज  केला. यापैकी 5 हजार फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले. पण या कार्डवर केवळ नावाचा उल्लेख आहे. बाकी व्यवसायाची माहिती त्याचे ठिकाण याचा कोठेही उल्लेख नाही त्यामुळे बायोमेट्रिक कार्ड असणारा फेरीवाला शहरात कोठेही जाऊन व्यवसाय करत होता. 

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत बायोमेट्रिक कार्ड देताना संबंधित व्यावसायिकांचे नाव, कोणता व्यवसाय करणार त्याची माहिती, व्यवसायाची वेळ व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या ठिकाणी व्यवसाय करणार ते ठिकाण नमूद करणे बंधनकारक आहे. ज्या त्या ठिकाणी व्यवसाय करणे बंधनकारक आहे. 

पण  2014 साली  जी बायोमेट्रिक कार्ड देण्यात आली त्या कार्डवर असे याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. सध्या जी बायोमेट्रिक कार्ड आहेत त्यातील अनेक कार्डवर  ही माहिती नाही. त्यामुळे कार्डचा गैरवापर करून कोणी कुठेही व्यवसाय करत आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांचा अंमल केल्यास नव्याने परिपूर्ण माहिती असणारे कार्ड उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर चाप बसणार आहे.