Thu, Aug 22, 2019 04:00होमपेज › Kolhapur › बड्या थकबाकीदारांना केडीसीच्या लिलाव नोटिसा

बड्या थकबाकीदारांना केडीसीच्या लिलाव नोटिसा

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनधी 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित थकबाकीदार संस्थांची व या संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा थेट इशाराच  या नोटिसामधून दिला आहे. बँकेच्या 23 जुलै रोजी झालेल्या औद्योगिक समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय एकमताने झाल्यानंतर बँक प्रशासनाने थकबाकीदार संस्थांच्या बाबतीत ही कठोर पावले उचलली आहेत.

गेल्या आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच 31 मार्च 2018 अखेर थकबाकीदार असलेल्या या संस्थांमध्ये शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ लि., कोल्हापूर, राधानगरी तालुका सहकारी मका प्रक्रिया (स्टार्च) संस्था मर्या. ठिकपुर्ली, विजयमाला बाबुराव देसाई सहकारी वाहतूक संस्था मर्या. मडिलगे बुद्रुक, शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्या. हेरवाड, भोगावती शेतकरी सहकारी कुक्कुटपालन संस्था मर्या. परिते, हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्या.- निलजी, महाराष्ट्र स्टेट को - ऑप. टोबॅको फेडरेशन- मार्केट यार्ड, कोल्हापूर , मयूर सहकारी वाहतूक संघ मर्या. -कोल्हापूर, पंत सहकारी वस्त्रोद्योग प्रोसेस संस्था लिमिटेड- तिळवणी, श्री.एस. के . पाटील सहकारी बँक लिमिटेड- कुरुंदवाड.या बड्या थकबाकीदार संस्थांचा समावेश आहे.

या कारवाईचा पहिला टप्पा म्हणून बँकेच्या वतीने या बड्या थकबाकीदार संस्थाच्या नाव व थकीत रक्कमेसह याद्या बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या दारात, थकबाकीदार संस्थांसह संचालकांच्या ही दारात मोठ-मोठाले होर्डींग्स वरती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच यासंबधीचे  निवेदन वृत्तपत्रांमधुनही प्रसिद्ध केले जाणार आहे. या नोटीशीत बँकेने पुढे म्हटलेले आहे की या मानहानीला बँक जबाबदार असणार नाही. बँकेने यापूर्वी राबविलेल्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेत ( ओटीएस) सहभाग घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी कळवूनही आपणाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.