होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल बांधकाम; परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा

पर्यायी पूल बांधकाम; परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी देण्याबाबत कायदेशीर बाबीवर शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय होईल, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.

पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे अडकले होते. ब्रह्मपुरी परिसरातील पुरातत्त्वच्या जागेचा संयुक्त सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार पुरातत्त्वची जागा निश्‍चित झाली आहे. पर्यायी पूल पुरातत्त्वच्या जागेपासून 100 मीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे, तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुरातत्त्वला सादर करण्यात आला आहे. यामुळे पुरातत्त्वकडून पुलाच्या बांधकामासाठी ‘ना हरकत’ देण्याची सकारात्मक प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. परवानगीची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी राज्य व जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. सुमारे दीड तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शिवाजी पुलाची सद्यस्थिती, नव्या पुलाची गरज, याबाबत सविस्तर माहिती दिली. पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराबाबतची माहिती दिली. पर्यायी पूल पुरातत्त्वच्या जागेपासून 40 मीटर अंतरावर असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी या जागेचा संयुक्त सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये पूल 100 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्याचे स्पष्ट झाल्याचे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पुरातत्त्वच्या जागेच्या सीमा निश्‍चित झाल्या आहेत, त्यांचे क्षेत्र निश्‍चित झाले आहे, पुलाचे अंतरही स्पष्ट झाले आहे. यामुळे परवानगी देण्याबाबत अडथळे दूर झाले आहेत, तरीही या प्रक्रियेतील प्रत्येक कायदेशीर बाबीवर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत महाधिवक्ता यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

या बैठकीला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, ठेकेदार एन. बी. लाड आदी उपस्थित होते.