Thu, Apr 25, 2019 18:39होमपेज › Kolhapur › ९ महिन्यांत तब्बल ३६ समित्यांची स्थापना

९ महिन्यांत तब्बल ३६ समित्यांची स्थापना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सदानंद पाटील

गेल्या तीन वर्षांत शासनाने 141 समित्यांची स्थापना केली आहे. यात मागील 1 एप्रिलपासून ते आत्तापर्यंत म्हणजेच या 9 महिन्यांत विविध विषयांच्या अनुषंगाने 36 समित्यांची स्थापना केली आहे. याशिवाय जिल्हा आणि विभागीय समित्यांचा विचार केला तर, हा आकडा 45 पेक्षा अधिक आहे. शासनाकडून दर महिन्याला सरासरी 4 समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. या नऊ महिन्यांत सर्वाधिक सात समित्या या कृषी व पशुसंवर्धन विभागाने घोषित केल्या आहेत. शासकीय विभागांचा बराचसा कारभार समित्यांमार्फत होऊ लागला तर मूळ विभाग करतात तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कृषी व पशुसंवर्धन विभागाने दर महिन्याला सरासरी एका समितीचा घोषणा केली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी सुकाणू व तांत्रिक सल्लागार समिती. नीलक्रांती योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरीय सुकाणू समिती. मत्स्यव्यसाय ठेक्यासंदर्भात, कृषी खतांसह मच्छीमार व्यावसायिकांच्या समस्यांबाबत समित्यांची स्थापना केली आहे. तर गृह विभागाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण, तसेच आयटी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या महिलांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक आरोग्यने जैव वैद्यकीय कचरा अधिनियमानुसार राज्यस्तरीय सल्लागार समिती स्थापली आहे.

वित्त विभागानेे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी उच्चतर समिती, महसूल व वन विभागानेही चार समित्यांची स्थापना केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागानेही भांडार समिती तसेच वाहतूक कंत्राट निश्‍चितसाठी समिती नेमली आहे.महिला बालकल्याणने योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तज्ञ समिती नेमली आहे.जलसंधारण विभागाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार सनियंत्रण समितीची घोषणा केली आहे.उद्योग उर्जा विभागाने राज्यात महापुरुष आणि गड किल्ल्यांची नावे बिअरबार, परवाना कक्ष, दारु विक्री केंद्र यांना न देण्याबाबत अधिनियमात सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आहे.