Tue, Jul 16, 2019 00:18होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विभागात 73 हजार करदाते

कोल्हापूर विभागात 73 हजार करदाते

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:05PMकोल्हापूर : डी.बी.चव्हाण

जीएसटीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. सर्व व्यापारी, उद्योजक, वाहतूकदार यांना जीएसटी लागू झाल्यामुळे नवीन करदात्यात 20 हजार 601 वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात 73 हजार 301 नोंदणीकृत करदाते आहेत. तर 369 करदात्यांना 94.26 कोटींचा परतावा देण्यात आला आहे, असे वस्तू व सेवाकर विभागाचे अप्पर आयुक्‍त सी. एम. कांबळे यांनी सांगितले. 

वस्तू व सेवा कर लागू होऊन एक वर्ष झाले आहेत. जीएसटीमुळे काही कर रद्द झाले आहेत. मात्र, कर आकारणीत पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आला आहे. हॉटेल, ऑटोमोबाईल, ज्वेलरी, धान्य व्यापारी, यार्न, कापड, कास्टिंग उत्पादक व व्यापारी या वस्तूंचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापार्‍यांसमोर अनेक अडचणी होत्या, त्या दूर करण्यात आल्या, त्यानंतर जीएसटीमधील क्‍लिष्टता दूर झाल्यानंतर अनेक व्यापार्‍यांनी स्वत:हून कर सल्‍लागाराशी संपर्क साधत जीएसटी भरण्यास तयार झाले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून कोल्हापूर आयुक्‍त कार्यालय क्षेत्रात 20 हजार 601 करदात्यांमध्ये वाढ झाली आहे. परिक्षेत्रात 73 हजार 301 करदाते आहेत. यामुळे 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत 272 कोटी  व अन्य करामध्ये 970 कोटींची वाढ झाली. 1 एप्रिल 2018 ते 30 जून 2018 या तीन महिन्यांत 313 कोटीं जमा झाले असून त्यामध्ये 90 कोटीचा महसूल वाढला आहे. म्हणजे  1 जुलै 2017 ते 30 जून 2018 या कालावधीत 1 हजार 283 कोटी महसूल जमा झाला आहे.  सी.बी.आय.सी. बोर्डाच्या निर्देशानुसार परतावा पंधरवडा दि. 16 मार्च ते 31 मार्च 2018 व 31 मे ते 16 जून 2018 पर्यंत घेण्यात आला. त्यामध्ये 369 करदात्यांना 94.26 कोटींचा परतावा देण्यात आला आहे.