Mon, Aug 19, 2019 11:45होमपेज › Kolhapur › आणखी ४०० शिक्षकांच्या होणार बदल्या 

आणखी ४०० शिक्षकांच्या होणार बदल्या 

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाने प्रथमच यशस्वीपणे राबविलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे एकाच शाळेत ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांना दणका बसला आहे. कायम सुगम भागातील शाळा मिळण्यासाठी धडपडणार्‍या काही जणांना दुर्गम आणि डोंगराळ भागात जावे लागले आहे. बदलीचा आदेश घेण्यासाठी शुक्रवारी पंचायत समितीमध्ये शिक्षकांची गर्दी झाली होती. दरम्यान, अजूनही साधारणपणे 350 ते 400 शिक्षकांना अद्याप शाळा न मिळाल्यामुळे त्यांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. 

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांचा विषय नेहमीच गाजत असतो. शिक्षकांची संख्या मोठी असल्याने आणि त्यांच्या काही संघटनाही प्रबळ असल्यामुळे त्याच्या जोरावर ही मंडळी जिल्हा परिषद प्रशासनाला अक्षरश: हतबल करत होती. बदलीचे अधिकार स्थानिक पातळीवर असल्यामुळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संघटनांचे नेते आदी जमेल त्या मार्गांनी अनेक शिक्षक आपल्याला हवी तशी सोयीची बदली करून घेत होते किंवा नको असलेल्या ठिकाणी बदली झाली तर ती रद्द करून घेत होते.

त्यामुळे अनेक शिक्षकांनी वर्षानुवर्षे एकाच शाळेत तळ ठोकून होते. काही शिक्षक नोकरीला लागल्यापासून एकाच तालुक्यात फिरत असल्याने दुर्गम भागातील शिक्षकांना तेथून बाहेर पडण्याची संधीच मिळत नव्हती.

शासनाने यावर्षी ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे बदलीचे अधिकार काढून घेतले. बदलीचा अर्ज ऑनलाईनवर भरून घेतला आणि बदलीचा ऑर्डरही थेट  ऑनलाईनद्वारे पंचायत समितीला पाठविली. त्यामुळे अखेरपर्यंत कोणत्याही शिक्षकाला आपली बदली कुठे झाली, याची माहिती नव्हती. बदलीचे आदेश पंचायत समितींना पाठविण्यात आले होते. ते घेण्यासाठी आज दिवसभर पंचायत समितीच्या कार्यालयात शिक्षकांनी गर्दी झाली होती. 

दरम्यान, काही शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करूनही त्यांना शाळा मिळालेल्या नाहीत. अशा शिक्षकांची संख्या साधारणपणे 350 ते 400 असण्याची शक्यता आहे. या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया लगेच सुरू करण्यात येणार आहे.