Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी २५ ला निवडणूक

महापौरपदासाठी २५ ला निवडणूक

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूरच्या नूतन महापौर निवडीसाठी 25 मे रोजी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी (21 मे) दुपारी तीन ते पाच या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असू शकते. पुणे विभागीय आयुक्तांनी 24 मे ही तारीख निवडणुकीसाठी निश्‍चित केली होती; परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस मिळत नाहीत. त्यासाठी रविवार येत असून त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत. परिणामी 25 ला निवडणूक घ्यावी, अशी विनंती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना केली आहे. 

 दरम्यान, 15 मे रोजी सायंकाळी महापालिका प्रशासनाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना 24 मे रोजी निवडणूक घेण्यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार विभागीय कार्यालयाने तारीख निश्‍चित केली; परंतु 18 मे रोजी तारीख निश्‍चित झाल्याने तारखेचा घोळ झाला आहे. दोन दिवसापूर्वी तारीख निश्‍चित झाली असती तर शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करून घेता येऊ शकले असते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी त्याबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुणे विभागीय कार्यालयाशी तारीख बदलण्याविषयी संपर्क साधला. 

पुढील अडीच वर्षे सर्वसाधारण महिला प्रवर्ग (ओपन) असे महापौरपदाचे आरक्षण आहे. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे शनिवारी दुपारी बाराला स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे सायंकाळी पाचला राष्ट्रवादीतील उपमहापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती घेतील. त्यानंतर रात्री काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सहलीवर रवाना होणार आहेत. थेट महापौर निवडणुकीदिवशीच सर्व नगरसेवक कोल्हापुरात येतील, असे सांगण्यात आले. 

महापौरपदाची धामधूम सुरू असली तरी भाजप-ताराराणी आघाडीकडून अद्यापही पत्ते खोलण्यात आलेले नाहीत. महापौर निवडून येण्याइतपत संख्याबळ नसल्याने कोणीही इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत भाजपने बिन आवाजाचा बॉम्ब फोडत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली होती. त्यामुळे महापौर निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.