Fri, Jul 19, 2019 20:02होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या युवकाचे यकृतदान

कोल्हापूरच्या युवकाचे यकृतदान

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:58PMकोल्हापूर :प्रतिनिधी 

पाय घसरून पडल्याने ब्रेन डेड झालेल्या ताराबाई पार्क येथील गुंजन मुरारी बासराणी (वय 24) या युवकाचे यकृतदान करण्याचा निर्णय गुंजन कुटुंबीयांनी घेतला. शनिवारी दुपारी साडेचार वाजता येथील एका खासगी रुग्णालयातून ग्रीन कॉरिडोरद्वारे रुग्णवाहिकेतून यकृत पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्येे प्रत्यारोपणासाठी नेण्यात आले.

रविवारी (दि. 8 जुलै) मित्राच्या लग्‍नात गुंजन पाय घरून पडला. बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी त्याला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय तपासणीत त्याच्या मेंदूला गंभीर मार लागल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्याला यातून वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यात फारसे यश आले नाही. त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी नातेवाईकांना गुंजनचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बासराणी कुटुंबीयांनी हृदय, किडनी, लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अवयवाच्या प्रतीक्षेत असणार्‍या रुग्णांची माहिती रुग्णालयाने घेतली. त्यानुसार त्यांचे रक्‍ताचे नमुनेही तपासण्यात आले. पण हृदय आणि किडणीचे नमुने जुळून आले नाहीत. पुण्यातील एका  रुग्णाचे  व गुंजनच्या रक्‍ताचे नमुने तंतोतंत जुळले. याची कल्पना डॉक्टरांनी गुंजनच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांनी यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. विशेष म्हणजे नातेवाईकांनी अन्य कोणते अवयव घेता येत असतील तर घ्या, असेही डॉक्टरांना सांगितले. 

दुपारी अडीच वाजता पुणे येथील रुग्णवाहिकेसह डॉ. दिनेश झिरपे, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. राहुल तांबे यांच्यासह पथक  कोल्हापुरात दाखल झाले. अवघ्या पाऊण तासात शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी यकृत यशस्वीरीत्या काढले. ते‘ग्रीन कॅरिडोर’द्वारे  कोल्हापूर येथील रुग्णालयातून सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, शाहू टोल नाका, पुणे-बंगळूर हायवेमार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाली. यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेनेे पंधराहून अधिक पोलिसांची फौज तैनात ठेवली  हेाती. यासाठी राजारामपुरी पोलिस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले.