Fri, Apr 26, 2019 09:27होमपेज › Kolhapur › ‘त्या’ 21 लॉजचे परवाने रद्द करणार

‘त्या’ 21 लॉजचे परवाने रद्द करणार

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वेश्या व्यवसायाला आश्रय देणार्‍या शहरासह ग्रामीण भागातील 21 लॉजचे व्यावसायिक परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे  प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. प्रस्तावावर लवकरच निर्णय शक्य आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी सांगितले.

कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, शहापूर, पुलाची शिरोली, गोकुळ शिरगाव, जयसिंगपूर, शिरोळ,  मलकापूर येथील लॉजचा समावेश आहे. वेश्या व्यवसाय रोखण्यासाठी अकार्यक्षम ठरलेल्या संबंधित पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकारी व बिट अंमलदारांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आल्याचेही ते म्हणाले.

वेश्या व्यवसायाला रोखण्यासाठी सर्वच लॉज, यात्री निवासांची दैनंदिनी तपासणीचे आदेशही जिल्ह्यातील सर्वच पोलिस उपअधीक्षकांना देण्यात आले आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे व श्रीनिवास घाटगे यांचे कारवाईवर नियंत्रण राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोनपेक्षा अधिकवेळा छापा, कारवाई झालेल्या लॉजमालकासह व्यवस्थापक, कर्मचार्‍यांसह एजंट साखळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित नियंत्रण (मोका) कायद्यासह तडिपारीचा बडगा  उगारण्यात येणार आहे. दीड वर्षात कारवाई झालेल्या सर्वच लॉजची माहिती मागविण्यात आल्याचेही ते म्हणाले.

लॉज मालकासह  साखळीवर ‘मोका’ लावणार

जयसिंगपूर-शिरोळ बायपास रोडवरील वादग्रस्त लॉजचीही माहिती उपलब्ध झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी विशेष पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत पीडित महिलांसह आठ जोडपी रंगेहाथ सापडली होती. संबंधित लॉज मालकासह वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणार्‍या एजंटाविरुद्ध‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षकांकडे लवकरच दाखल होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

लॉज, यात्री निवासच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
लॉज, यात्री निवासच्या नावाखाली शहरासह जिल्ह्यात अनेक लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. गोरगरीब, असहाय्य मुलींना आर्थिक आमिष दाखवून त्यांना शरीरविक्रयास भाग पाडण्यात येत असल्याचे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकामार्फत जिल्ह्यात कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. वादग्रस्त लॉजची यादीच तयार करण्यात आली आहे. त्याच्यावर टप्प्या-टप्प्याने बडगा उगारण्यात येत आहे. काही लॉजमध्ये शाळा, महाविद्यालयीन युवतींना बेकायदा प्रवेश दिला जात असल्याच्या पालक व शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.  वेश्या व्यवसायासाठी वापर होणार्‍या लॉजची नागरिकांनी थेट कोल्हापूर येथील पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, माहिती देणार्‍यांच्या नावाबाबत गोपनियता पाळण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Tags: kolhapur, lodge licenses, canceled, kolhapur news