Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा हवेतच!

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा हवेतच!

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 11:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी

होणार होणार म्हणणारी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अद्याप हवेतच राहिली आहे. ‘उडान’ योजनेच्या दुसरा टप्पा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर-बंगळूर, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-तिरूपती या मार्गावर विमानसेवा निश्‍चित केल्या आहेत. या मार्गावरील सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने देशातील शहरे विमानसेवेने जोडण्यासाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्वस्त दरात प्रवास करता येणार आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचा समावेश करण्यात आला होता. त्यानूसार ‘एअर डेक्कन’ कंपनीची सेवा या मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणार होती. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा निश्‍चित करण्यात आली होती. विमानसेवेसाठी आवश्यक वाहतूक परवाना मिळाल्यानंतर कोल्हापुरातील ही विमानसेवा सुरू होणार होती. कोलहापूर विमानतळाला वाहतूक परवाना (डे ऑपरेशन लायसन्स्) मिळाल्यानंतर विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला मिळालेली वेळ (स्लॉट) अत्यंत गैरसोयीचा असल्याने विमानसेवा महिनाभर तरी सुरळीत चालेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. कंपनीने स्लॉट बदलून मिळावा तसेच आठवड्यातून किमान सहा दिवस ही विमानसेवा सुरू रहावी, अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. मुंबईतील वेळ बदलून मिळणे आणि आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा सुरू करणे सध्या तरी शक्य नसल्याने, कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा बारळगल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी अशीच मागणी असताना, कोल्हापूर ते बंगळूर, हैदराबाद व तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. ‘उडान’ योजनेचा दुसरा टप्पा बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात हे नवीन मार्ग निश्‍चित करण्यात आले. कोल्हापुरातून अन्य शहरासाठी विमानसेवा सुरू होणे आनंददायीच बाब आहे. मात्र, सध्या तरी कोल्हापूर-मुंबई अशीच विमानसेवेची गरज आहे. ही विमानसेवा सुरू होण्याऐवजी अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. कोल्हापूर-तिरूपती या मार्गावरील विमानसेवेला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र, अन्य दोन शहराबाबतचा प्रतिसाद कसा मिळेल हे सांगणे कठीण आहे. 

कनेक्टिंग फ्लाईटद्वारे कोल्हापूर-मुंबई जोडणे शक्य
सध्या वेळेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झालेली नाही. मात्र, या मार्गावर कनेक्टिंग फ्लाईटचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्याद‍ृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोल्हापूर विमानतळाची क्षमता आणि त्यानुसार या विमानतळावर सध्या उतरू शकणारी विमाने, असणार्‍या कंपनीद्वारे ही सेवा देणे शक्य होऊ शकते. मुंबई ते चेन्नई, बंगळूर, मंगळूर, म्हैसूर, कोचीन, त्रिवेंद्रम, गोवा, बेळगाव या मार्गावर विमानसेवा सुरू आहे, यातील काही विमानसेवा व्हाया कोल्हापूर करता आली, तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना मुंबईसाठी विमानसेवा सुरू होऊ शकते. त्याद‍ृष्टीने नियोजन करून तसेच प्रयत्न होणे गरजेचे आहे.