Wed, May 22, 2019 10:40होमपेज › Kolhapur › दुचाकीची दगडाला धडक शिवप्रेमी ठार एक जखमी

दुचाकीची दगडाला धडक शिवप्रेमी ठार एक जखमी

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 19 2018 10:18PMकोडोली : वार्ताहर

कोडोली-काखे रस्त्यावरील चांदोली वसाहतीजवळ दुचाकीची दगडाला जोरात धडक बसली. या धडकेने दुचाकीवरील दोघेजण वारणा उजव्या कालव्यात पडल्याने एकजण जागीच ठार झाला. सूरज मोहन खोचरे (वय 23) असे त्याचे नाव असून सूरज बाळासो सूर्यवंशी (22, दोघे रा. पणुंब्रे, ता. शिराळा) हा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजता शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडाकडे जात असताना घडली. सूरज खोचरे व सूरज सूर्यवंशी हे दोघे शिवजयंतीनिमित्त मुंबईहून गावी पणुंब्रे येथे आले होते.

रविवारी रात्री दुचाकीवरून शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडावर जात असताना चांदोली वसाहतीजवळ वारणा उजव्या कालव्याजवळील रस्त्याकडेला असणार्‍या एका मोठ्या दगडास दुचाकीची जोरात धडक बसली. या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील दोघे वारणा उजव्या कालव्यात पडले. सुमारे 50 फूट खोल खाली पाण्यात पडल्याने सूरज खोचरे हा तरुण जागीच ठार झाला.

सूरज सूर्यवंशी जखमी अवस्थेत पोहत कालव्यातून वर आला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने चांदोली वसाहतीतील सुरेश पाटील, दादासाो पाटील, राहुल वनवे, संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सूरज खोचरे याला बाहेर काढले व उपचाराकरिता कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.