Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Kolhapur › ३३ केबिन्ससह ११ शेड हटविले

३३ केबिन्ससह ११ शेड हटविले

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 12:19AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरातील विनापरवाना 33 केबिन्ससह 11 शेड महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी दिवसभर हटविण्याबरोबरच होर्डिंग्ज व बॅनरही काढली. पाडळकर मार्केटसमोरील केबिन्स हटविताना शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे काहीकाळ मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर तेथील दोन केबिनसाठी एक दिवसांची मुदत देऊन कारवाई थांबविण्यात आली. 

भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी पुतळा, जुना राजवाडा, जोतिबा रोड, करवीरनगर वाचन मंदिर रोड, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा स्टँड ते ताराबाई रोड या रस्त्यावर रहदारीस अडथळा करणार्‍या अनधिकृत केबिन-33, रस्त्यावरील स्टॉल- 30, दुकानांच्या छपर्‍या व रॅक-15 हटविले. विनापरवाना उभारलेले 16 होर्डिंग्ज, 75 बॅनर, पोस्टर काढले. जोतिबा रोडवरील फुलवाले यांना रहदारीस अडथळा न होता व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त होता. अतिक्रमण कारवाईमुळे जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, करवीरनगर वाचन मंदिर रोड वाहतुकीस पूर्णपणे खुला झाला आहे. पवडी विभागाकडील 150 कर्मचार्‍यांनी कारवाईत भाग घेतला. 

पाडळकर मार्केटसमोरील विनापरवाना दोन केबिन काढण्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. धनाजी दळवी  म्हणाले, की यापूर्वी शिवसेनेने मोर्चा काढल्यावर बैठक घेऊन चर्चा करण्याची ग्वाही प्रशासनातर्फे दिली होती. परंतु, बैठक न घेताच कारवाई करणे चुकीची आहे. त्यामुळे केबिन काढू देणार नसल्याचा पवित्रा 30 ते 40 कार्यकर्त्यांनी घेतला. तणाव निर्माण झाल्साने मनपा अधिकार्‍यांनी उद्यापर्यंत केबिन काढून घेण्यासाठी मुदत दिली. 

केएमटी कर्मचार्‍यांचे पगारासाठी महापौरांना साकडे

केएमटी कर्मचार्‍यांनी तीन महिन्यांच्या थकलेल्या पगारासाठी महापौर स्वाती यवलुजे यांना मंगळवारी साकडे  घातले. लवकर पगार न झाल्यास बेमुदत केएमटी बंद करण्याचा इशाराही दिला. महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी आठ दिवसांत ऑगस्टचा पगार करू, अशी ग्वाही दिली. यावेळी प्रमोद पाटील, मनोज नार्वेकर, राजू ठोंबरे, निजाम मुल्लाणी, ईर्षाद नायकवडे, जयपाल माने आदींसह कर्मचारी उपस्थित होते.