Sun, May 19, 2019 22:09होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : चाकूहल्ला; दोघांना अटक

कोल्हापूर : चाकूहल्ला; दोघांना अटक

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:24AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

सिद्धार्थनगरात शनिवारी रात्री ऋषिकेश घोलप याच्यावर झालेल्या चाकूहल्ल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. यापैकी गिरीश वामनराव समुद्रे (वय 51), रोहित सचिन शिर्के (24, रा. सिद्धार्थनगर) या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. संशयितांमध्ये एक अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

सिद्धार्थनगरातील अभिषेक बनगे व प्रमोद दळवी हे दोघे शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून सिद्धार्थनगरातून चालले होते. यावेळी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्यांचा गल्लीतील तरुणांसोबत वाद झाला. यातून चिडून गिरीश समुद्रे, रोहित शिर्के, अमोल कांबळे यांनी त्याला मारहाण केली. 

अभिषेकला मारहाण होत असताना सोडविण्यास गेलेला त्याचा आतेभाऊ ऋषिकेश घोलप याला मारहाण करण्यात आली. तसेच त्यातील एकाने चाकूने ऋषिकेशला भोसकले. पोटात अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर बनल्याने त्याच्यावर सीपीआरमध्ये तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. रात्री बाराच्या सुमारास ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. 

एकमेकांकडे बघण्याचे कारण

सिद्धार्थनगरात एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटांत वाद झाला होता. शनिवारी झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. तसेच चाकूहल्ला करणाराही अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक डी. व्ही. ढेरे, एस. ए. सरवडेकर करीत आहेत.