Sun, May 19, 2019 14:35
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शालेय पोषण आहार पुरवठादार भूतडा कारवाईच्या फेर्‍यात

शालेय पोषण आहार पुरवठादार भूतडा कारवाईच्या फेर्‍यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिंगणापूर येथील शाळेत शालेय पोषण आहाराच्या तांदळातील अपहारप्रकरणी जि.प.कडे प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानंतर सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी बचतगटाचा ठेका काढण्याविषयी गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत, तर मुख्याध्यापकांना सक्त ताकीद दिली आहे. पोषण आहार पुरवठादार एम. पी. भूतडा यांच्यावर कारवाईचे अधिकार शालेय पोषण संचालकांकडे असल्याने मंगळवारी पुण्याला 14 पानी अहवाल पाठवला आहे. यात पुरवठादार दोषी असल्याचा ठपका ठेवल्याने कारवाई अटळ मानली जात आहे. 

जि. प.च्या शिंगणापूर शाळेत कमी वजनाचा तांदूळ वाटप होत असल्याची तक्रार 2 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली होती. ग्रामस्थांनीच हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जि.प. ने करवीरचे गटशिक्षणाधिकारी व पोषण आहारचे प्रभारी अधीक्षक यांना चौकशीसाठी नियुक्त केले होते. त्यांनी जि.प. कडे पाठवलेल्या अहवालानंतर सीईओ डॉ. खेमनार यांनी ठेकेदार भूतडा, मुख्याध्यापक विजय जाधव, जीवनरेखा महिला बचतगट अध्यक्ष यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. नोटिसीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी सीईओंनी आपल्या अधिकारात असलेल्या मुख्याध्यापक व बचतगट अध्यक्षांवर कारवाई केली आहे. 

पुरवठादारावर कारवाईचे अधिकार जि.प.च्या अधिकार कक्षेत येत नसल्याने तो पुण्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक शालेय पोषण आहार यांच्याकडे 14 पानी अहवाल पाठवण्यात आला आहे. या अहवालात भूतडा यांनी वाहनामध्ये ठेवलेले वजनकाटे सदोष असून प्रमाणित केलेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाटपासंबंधी निर्माण झालेली तक्रार निर्माण होण्यास पुरवठादारच जबाबदार असल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशीही शिफारस करण्यात आली आहे. 

संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी 

एम.पी.भूतडा हे लातूरचे असून त्यांच्याकडे कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्याची जबाबदारी आहे. 11 एप्रिल 2017 पासून जिल्हा परिषदेने त्यांना पुरवठादार म्हणून ठेका दिला आहे. दोन महिन्यांचा आहार एकदम दिला जातो. त्याचे साधारपणे एक कोटी रुपये आदा केले जातात.