Tue, Jul 16, 2019 02:00होमपेज › Kolhapur › उपाध्यक्षपदी मा.श्री. सुनिल कुलकर्णी, सचिवपदी मा. श्री. दिपक चौगुले यांची निवड

केआयटीच्या अध्यक्षपदी मा. श्री. भरत पाटील

Published On: Jul 26 2018 5:42PM | Last Updated: Jul 26 2018 5:42PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

 अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था असा लौकिक असणा-या कोल्हापूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पदाधिका-यांच्या निवडी नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेत संपन्न झाल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक मा. श्री. भरत पाटील यांची, उपाध्यक्षपदी उद्योजक मा. श्री. सुनिल कुलकर्णी यांची निवड झाली आणि सचिवपदी उद्योजक मा. श्री. दिपक चौगुले यांची निवड झाली. आज दि. 25 जुलै 2018 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला.

संस्थेचे नूतन अध्यक्ष उद्योजक मा. श्री. भरत पाटील यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शेतीविषयक अवजारे निर्मितीचा प्रोजेक्ट त्यांनी यशस्वीरितीने पूर्ण केला. आणि याच कल्पनेचा उपयोग करुन त्यांनी आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. जपानमधील ओसाका येथून व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगत शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

केआयटीचे संस्थापक विश्वस्त, ज्येष्ठ उद्योजक स्वर्गीय मा. श्री. डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा इंजिनिअर्स आणि डेक्कन फार्म इक्विपमेंट प्रा. लिमिटेडच्या माध्यमातून कृषि-उद्योग क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील कंपन्यांना त्यांच्या वैशिष्ट¬पूर्ण उत्पादनाबद्दल तीनवेळा पारखे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. रोटरी आणि रोटरॅक्ट संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा त्यांनी जपला आहे. शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या संचालक पदाच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एसएसआयतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. सध्या अॅग्रीकल्चरल इम्प्लीमेंटस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे ते महाराष्ट्रचे अध्यक्ष आहेत.

संस्थेचे नूतन उपाध्यक्ष झालेले उद्योजक मा.श्री. सुनिल कुलकर्णी यांनाही केआयटीचे संस्थापक सेक्रेटरी आणि ज्येष्ठ उद्योजक स्वर्गीय श्री. भाऊसाहेब कुलकर्णी यांचा उद्योजकतेचा वारसा लाभला आहे. प्रॉडक्शन इंजिनिअरींगमधून विशेष प्राविण्याने पदवी प्राप्त केल्यानंतर सध्या ते एस. यशवंत अॅण्ड कंपनी या उद्योगाची धुरा सांभाळीत आहेत. वाहन उद्योगक्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांना या कंपनीकडून उत्पादने पुरविली जातात. त्यांनी यापूर्वीही केआयटीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच संस्थेचे सचिव म्हणून काम करताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. केआयटी अॅल्युमिनी असोसिएशनचे व्हाईस चेअरमन म्हणूनही ते कार्यरत आहेत. व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य अशा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट लखनऊ (आयआयएम) येथून त्यांनी एक्झिक्युटिव्ह एमबीए पूर्ण केले आहे.  

संस्थेच्या सचिवपदी निवड झालेले उद्योजक मा. श्री. दिपक चौगुले यांनाही ज्येष्ठ उद्योजक स्वर्गीय श्री. दादासाहेब उर्फ लक्ष्मण चौगुले यांचा उद्योजकतेचा वारसा लाभला आहे. प्रॉडक्शन इंजिनिअरींगची पदवी विशेष प्राविण्यासहित प्राप्त केल्यानंतर ते सध्या एमआयडीसी शिरोली स्थित भारत उद्योगाच्या प्रतिथयश कारखान्याची यशस्वीपणे धुरा सांभाळीत आहेत. चौगुले मशीन प्रायव्हेट लि. व एल बी इंजिनिअरींग या कारखान्यांचेही संचालक म्हणून काम पाहत आहेत. शिरोली मॅन्युफॅक्चरींगचे निमंत्रित संचालक म्हणूनही त्त्यांनी काम पाहिले आहे. सध्या कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन व कोल्हापूर चेंबर व ऑफ कॉमर्सचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी केआयटीचे आयएमईआरचे विश्वस्त संचालक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. 

सभेस उपस्थित संस्थेच्या सर्व संचालकांनी नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे मावळते चेअरमन श्री. सचिन मेनन व मावळते सेक्रेटरी श्री. साजिद हुदली यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या संस्थेच्या प्रगतीचा मागोवा घेताना संस्थेस नॅकचे मानांकन, एनबीएचे मुल्यांकन, स्वायत्तता यांचा उल्लेख करुन या यशोगाथेमध्ये महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले हे नमूद केले. 

संस्थेच्या संस्थापक संचालकांनी घालून दिलेले आदर्श व नियमावली यावर वाटचाल करुन संस्थेस येत्या काळातही भरीव यश मिळविण्यासाठी कार्यरत राहण्याचा मानस नवीन पदाधिका-यांनी व्यक्त केला. संस्थेस मिळालेला स्वायत्त दर्जा व त्या अनुषंगाने महाविद्यालयातील अभियांत्रिकी अभ्यासक्रम अधिकाधिक उद्योजकताभिमुख व रोजगारनिर्मितीक्षम करण्याचा विचार यावेळी संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री. भरत पाटील यांनी बोलून दाखविले. 
नूतन पदाधिकारी मंडळ 1 ऑगस्ट 2018 रोजी पदभार ग्रहण करणार आहे.