होमपेज › Kolhapur › हातकणंगले : पुण्याहून आलेला युवक पॉझिटिव्ह; किणी गाव शुक्रवारपर्यंत बंद

हातकणंगले : पुण्याहून आलेला युवक पॉझिटिव्ह; किणी गाव शुक्रवारपर्यंत बंद

Last Updated: May 25 2020 2:12PM
किणी : पुढारी वृत्तसेवा 

पुण्याहून आलेल्या व संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या किणी (ता.हातकणंगले) येथील युवकाचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून किणी गांव येत्या शुक्रवार अखेर पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.  

वाचा : भुदरगड तालुक्याची अर्धशतकाकडे वाटचाल; आज १२ नव्या रुग्णांची भर          

किणी येथील २६ वर्षीय युवक पुणे येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता. १० मे रोजी तो पुण्याहून थेट शिवाजी विद्यापीठ येथील विलगीकरण कक्षात दाखल झाला. दरम्यानच्या काळात त्याचा स्वॅब घेण्यात आला तो निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला किणी येथील शाळेतील संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. पण, चार दिवसांनी त्याला घशाचा त्रास जाणवू लागल्याने सीपीआरमध्ये नेऊन पुन्हा स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा किणीस पाठविण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. 

वाचा : कोल्हापुरात तब्बल ३१ कोरोनाग्रस्त सापडले; बाधितांची चारशेकडे वाटचाल 

त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआर येथे रात्री दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या चार लोकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तो युवक आणखी कुणाच्या संपर्कात आला आहे का याची माहिती घेण्यात येत आहे. या विषयावर तातडीने ग्राम दक्षता समितीची बैठक घेऊन शुक्रवार २९ मे अखेर अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच बाधित तरुणाच्या घराभोवतीचा परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.