Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Kolhapur › केरळच्या मदतीला  कोल्हापूरकर धावले

केरळच्या मदतीला  कोल्हापूरकर धावले

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 19 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जलप्रलयाने हाहाकार उडालेल्या केरळच्या मदतीला कोल्हापूरकर धावून गेले आहेत. नैसर्गिक आपत्ती, मग ती कोणतीही असो आणि कुठेही येवो तिथे जाऊन मदतीचा हात देण्याचा बाणा कोल्हापूरकरांनी केरळमध्ये जाऊन जपला आहे. एका वैद्यकीय पथकासह अन्‍नछत्र सुरू करण्यासाठी काही हॉटेल व्यावसायिकांसह व्हाईट आर्मीचे जवान केरळला रवाना झाले. 

गेल्या शंभर वर्षांत पहिल्यांदाच केरळला प्रचंड महापुराचा विळखा पडला आहे. सुमारे साडेतीन लाख लोक बेघर झाले असून, संपूर्ण देशभरातून केरळला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशा आपत्तीच्या वेळी मदतीसाठी नेहमीच तयार असलेल्या कोल्हापुरातील काही सामाजिक संस्था, व्यक्‍तींनी केरळला धाव घेतली आहे. 

शनिवारी सकाळी व्हाईट आर्मीचे 16 जणांचे पथक केरळला रवाना झाले. त्यांच्यासोबत हॉटेल मालक संघाचे प्रतिनिधी उज्ज्वल नागेशकर व त्यांचे सहकारी आहेत. आज, रविवारी सायंकाळी हे पथक केरळमधील कोची शहरात पोहोचले. सोमवारी (दि. 20) नागेशकर व त्यांच्या पथकाकडून या शहरात अन्‍नछत्र सुरू करण्यात येणार आहे. किमान तीन दिवस पुरेल एवढे अन्‍नधान्य या पथकाकडून नेण्यात आले. त्यांच्यासोबत आचारी, सेवा देण्यासाठीचे कार्यकर्ते यांचा समावेश आहे. आज एक डॉक्टर, दोन परिचारिका व त्यांच्यासोबत व्हाईट आर्मीचे सहा जवान असे पथक केरळकडे रवाना झाले. वैद्यकीय पथकासोबत चार-पाच दिवस पुरेल एवढा औषध साठा देण्यात आला आहे. कोल्हापुरातून याचे नियोजन जिल्हा प्रशासनासोबतच व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे करत आहेत. केरळमध्ये पोहचलेल्या नागेशकर यांच्याकडून सद्यस्थितीत त्याठिकाणी कशाची गरज आहे हे पाहून त्याप्रमाणे कोल्हापुरातून मदत पाठवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.