Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Kolhapur › केडीसीसी बँकेला 24 तासानंतर 4 कोटींची रक्कम परत मिळाली

केडीसीसी बँकेला 24 तासानंतर 4 कोटींची रक्कम परत मिळाली

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 12:58AMसंकेश्‍वर, निपाणीः प्रतिनिधी  

बेहिशेबी म्हणून ताब्यात घेतलेली चार कोटींची रक्कम हिशेबी आणि अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक विभाग व पोलिसांनी ती रक्कम शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास म्हणजेच 24 तासांनी केडीसीसी बँक व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली.

कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाताना कोगनोळी नाक्यावरून ही रक्कम पार कशी झाली, हा प्रश्‍न आहे. एका राजकीय पक्षाची रक्कम गोव्यातून कर्नाटकात येणार होती. मात्र, ती रक्कम तपासणी नाक्यावरून बिनबोभाट पार झाल्यामुळे पोलिसांनी ही रक्कम पकडून ठेवल्याची चर्चा आहे. 

कोल्हापूरच्या केडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयातून गडहिंग्लज उपविभागातील आजरा, चंदगड या तालुक्यातील बँकेच्या शाखांसाठी एका खासगी वाहनातून चार कोटींची रक्कम बटवड्यासाठी नेण्यात येत होती. हे वाहन बुगटे आलूरनजीक अचानकपणे बंद पडले. त्यानंतर गडहिंग्लजहून दुसर्‍या वाहनाला पाचारण करण्यात आले. 

दुसर्‍या वाहनातून रोकड घेऊन जाताना वाहनाची भैरापूर तपासणी नाक्यावर तपासणी  झाली. तपासणीत वेगवेगळया बॅगांमध्ये 4 कोटी  रोकड आढळली. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच बँकेचे कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकारी व गडहिंग्लज येथील अधिकार्‍यांनी संकेश्‍वर पोलिसांना पुरावा दिला. 

नोडल अधिकारी बसवराज यांना हवी ती कागदपत्रे सादर केली. त्यानंतर रात्री आम्हाला रक्कम परत मिळाल्याचे बॅँकेचे कार्यकारी संचालक डॉ. अशोक माने यांनी सांगितले. या रकमेचे पत्र, संबंधित बँकेचे कर्मचारी सोबत असताना झालेली ही कारवाई अनाकलनीय असल्याचे बँकेचे तपासणी अधिकारी आप्पासाहेब वाळके यांनी सांगितले.

गाडीसोबत बँकेचे कर्मचारी होते. त्यांच्याबरोबर पत्रही होते. बँकेचे ओळखपत्र असतानाही पोलिस आणि निवडणूक विभागाने जी कारवाई केली ती पूर्णपणे चुकीची असून सदरची रक्कम गडहिंग्लज, चंदगड, आजरा शाखांसाठी पाठविली जात होती.  
-हसन मुश्रीफ,  अध्यक्ष, केडीसीसी, कोल्हापूर.
 

Tags : kdcc bank, kolhapur news