Wed, Jun 26, 2019 11:43होमपेज › Kolhapur › 23 प्रकरणांतील सोने बनावट

23 प्रकरणांतील सोने बनावट

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा  बँक कसबा बावडा शाखेत सोने तारण ठेवून कर्ज उचललेल्या 23 प्रकरणांतील सोने बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. हे सोने ठेवलेल्या पिशवीवरील पावतीवर सराफाची सही नाही.  

गेल्या आठवड्यात याच शाखेत शिये येथील वंदना मोरे या महिलेने तारण ठेवलेले दागिने कर्ज भरून सोडवले असता ते बनावट निघाले. ज्या पिशवीत सोने ठेवले होते, त्यावर चिकटवलेल्या पावतीवरील सह्याही संशयास्पद होत्या. त्यामुळे बँकेने शाहूपुरी पोलिसात तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती. 

बँक प्रशासनाने तारण सर्वच दागिने छाननीचा निर्णय घेतला आहे. या शाखेत किमान 250 कर्जदारांनी सोने तारण कर्ज उचलले आहे. कर्जाची ही रक्कम किमान पाच ते सहा कोटींच्या आसपास असल्याचे समजते. यापैकी 14 कर्जदारांनी मुदत संपूनही दागिने सोडवून नेले नसल्याचे बँकेने केलेल्या तपासणीत पुढे आले. त्यामुळे या सर्वच कर्जदारांना आज सुट्टी असूनही बावडा शाखेत चौकशीसाठी बोलवले होते. यापैकी सात कर्जदारांच्या नावावर दोन प्रकरणे आहेत. बावड्यातीलच सन्मुख ढेरे बँकेचे सराफ आहेत. त्यांच्या समक्षच ही तपासणी करण्यात आली.

सकाळी दहापासून ही चौकशी सुरू होती. कर्जाची मुदत संपलेल्या कर्जदारांच्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यांनी तर पिशवीतील सोने आपले नसल्याचे सांगितले.  या चौकशीसाठी जिल्हा बँकेचे तपासणी प्रमुख आलासे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांची मोठी फौज होती. 

बनावट सोने असलेल्या पिशवीत कर्जदारांचे किमान 125 तोळे सोने होते, असे समजते. आजच्या बाजारभावाने या सोन्याची किंमत अंदाजे 40 ते 45 लाख होते.  आज व उद्या बँकेला सुट्टी असल्याने सोमवारीच याबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी सोने विकत घेऊन दिले

मार्च 2018 मध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. हा कर्जदारही शिये (ता. करवीर) येथील रहिवासी होता. त्याने कर्जाची परतफेड केल्यानंतर मिळालेले सोने बनावट असल्याचे सांगितले. हे प्रकरण अंगलट येणार असे लक्षात येताच या कर्जदाराला त्याने ठेवलेले सोने विकत घेऊन दिले.