Thu, Nov 15, 2018 13:49होमपेज › Kolhapur › थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन चालणार नाय

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन चालणार नाय

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:09AM

बुकमार्क करा
कौलव ः प्रतिनिधी

जुन्या वर्षाला निरोप  देतानाच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सरसावली असली, तरी धिंगाणा रोखण्यासाठी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार असून, राधानगरी धरणावरही पर्यटकांना बंदी घातली आहे. गेल्या काही वर्षांत 31 डिसेंबर आणि तरुणाईचा जल्लोष, असे समीकरण तयार झाले आहे.  तरुणवर्ग अगोदरच आठ दिवस सेलिब्रेशनचे प्लॅनिंग करत आहे. मोकळ्या मैदानांत, लांब डोंगरांत अथवा दाजीपूर अभयारण्यात जाऊन संगीत मांसाहारी भोजनावर ताव मारण्याची प्रथा रूढ झाली आहे. 

गेल्या दोन वर्षांत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकसारख्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या सेलिब्रेशनच्या प्रसारासाठी सोशल मीडियावर झुंबड उडाली आहे. ग्रामीण भागातही ढाबा संस्कृती फोफावली असून, ग्राहकांना खेचण्यासाठी ढाब्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. अनेक ठिकाणी अनलिमिटेड ऑफरसह फ्रीचीही योजना झळकत आहे. या जल्लोषाला बर्‍याचदा हुल्लडबाजीचे गालबोट लागते. राधानगरी तालुक्यात डोंगरदर्‍यांसह दाजीपूर अभयारण्य व आजूबाजूच्या निसर्गरम्य ठिकाणी चुली पेटतात. हुल्लडबाजीमुळे पर्यावरणाचा विध्वंस होतो. त्यामुळे दि. 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी घातली आहे. पोलिस खातेही 31 डिसेंबरच्या जल्लोषावर करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे यावर्षीचा 31 डिसेंबर साजरा करताना जरा सबुरीनेच घ्यावे लागणार आहे.