Sun, Aug 18, 2019 20:54होमपेज › Kolhapur › वाहतूक विभागाची उचलेगिरी

वाहतूक विभागाची उचलेगिरी

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 11:43PMकसबा बावडा : प्रतिनिधी

शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रसंगी वाहनधारकांवर कारवाई  करण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही; पण ज्या ठिकाणी वाहतूक नियमांचे फलकच नाहीत, जेथे फलक आहेत त्यावर शब्दच नाहीत, काही ठिकाणचे फलकच दिसत नाहीत, अशा ठिकाणी एखाद्या वाहनधारकांने नजरचुकीने जरी वाहन लावले तर शहर वाहतूक शाखेच्या ‘टो व्हॅन’ने ते उचलले म्हणून समजा. बर ही कारवाई करताना वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍याऐवजी ‘टो व्हॅन’मध्ये मागे बसलेले टोळके थेट वाहनांवरच उडी घेते अन् बघता बघता वाहन क्रेनमध्ये ठेवून पावती लागू केली जाते.  अशावेळी वाहनधारकांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी वाहतूक शाखेचे कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. 

 वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीला शिस्त लावणे नागरिकांना अभिप्रेत आहे; पण नियमांच्या नावाखाली वाहनांच्या ‘उचलेगिरी’तून वाहनधारकांची लूट होताना दिसत आहे.  वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 9 वाजेपर्यंत  वाहने सोडवून घेण्यासाठी वाहनधारकांची रिघ लागलेली  असते.  गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून सूचना देणारे फलक वाहतूक नियंत्रण विभागाकडून लावण्यात आले आहेत तर काही रस्ते एकेरी केले आहेत. ज्या ठिकाणी नो पार्किंगसह इतर सूचनेचे  फलक लावलेले आहेत, त्यामधील अनेक फलक वाहनधारकांनाच दिसत नाहीत. तर काही ठिकाणी फलकावरील अक्षरच गायब झाल्याने फलक कोरे पडले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरचा परिसर म्हणजे वाहतूक नियंत्रण शाखेसाठी ‘कुरण’च आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर  दोन सूचनादर्शक फलक वाहतूक नियंत्रण शाखेकडून उभारले आहेत. दोन्ही फलकांवरील सूचना गायब आहेत.  ...त्यांना किती दंड करणार कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेकडे सध्या सहा क्रेन भाडेतत्त्वावर आहेत. या क्रेनच्या केबिनमध्ये बसण्याची सोय आहे, तेवढ्याच व्यक्तींनी यामध्ये बसून प्रवास करणे परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अन्वारीस यांनी स्पष्ट केले; पण प्रत्यक्षात या क्रेनवर 4-5 कर्मचारी कार्यरत असल्याचे शहरवासीयांनी अनुभवले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडे कार्यरत वाहनेच नियमांचा भंग करत नाहीत का? मग यांना रोज कोण आणि किती दंड करणार असा प्रश्‍न उपस्थित होतो.