Tue, Mar 19, 2019 09:24होमपेज › Kolhapur › करूळ घाटातील प्रवास बनला खडतर!

करूळ घाटातील प्रवास बनला खडतर!

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:17AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

पावसामुळे करूळ घाटातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता दुभंगल्याने घाटमार्गच बदलू लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंदाधुंद कारभार करूळ घाटाच्या आणि प्रवाशांच्या नशिबी आला आहे.कायमस्वरूपी दुरुस्तीऐवजी या विभागाने घाटात पडलेले खड्डे मुरमाने भरून घेतले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतूक असलेला करूळ घाट वाहतुकीस धोकादायक बनला आहे. करूळ घाटातील रस्ता सात ठिकाणी खचला आहे. संरक्षक कठडे दरीत तुटून गेले आहेत.तर लोखंडी ग्रील सडले आहेत. ज्या ठिकाणी रस्ता दुभंगला आहे, तेथे चिव्यांचे कुंपण करून कापडी चिंध्या बांधल्या आहेत. परतीच्या पावसात घाटातील रस्त्याची व संरक्षक कठड्यांची मोठी पडझड झाली आहे. तीन ठिकाणी मोठ्या दरडीही कोसळल्या आहेत. वाहनांवर कधी दरड कोसळेल, हे सांगता येत नाही. दरडीपासून संरक्षण म्हणून तारेच्या  जाळ्यांचे कुंपण करण्यात आले आहे, तरीदेखील मोठे दगड रस्त्यावर कोसळत आहेत. 

घाट रस्त्यावर गटारी नसल्याने पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी थेट रस्त्यावर येते. त्यामुळे रस्ता दुभंगतो व संरक्षक कठड्यांना तूट लागते. यंदाही अशीच परिस्थिती घाटाने अनुभवली आहे; सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. अतिधोक्याची चार वळणे आहेत. तर छोटी बाराहून अधिक वळणे आहेत. यंदा पावसात करूळ घाटात चार ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या. घाटातील रस्त्यालगत गटारी नसल्याने पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे रस्ताच तुटला आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडले असून, मुरमाने बुजविले आहेत. रात्रीच्या प्रवासासाठी उपयुक्‍त असणारे केटामाईन व पांढरे पट्टे रस्त्यावर दिसत नाहीत. दिशादर्शक फलकांची तर वाटच लगली आहे. विश्रांती थांब्यांवरील सिमेंटची बाकडी व निवाराशेड गायब झाले आहेत.

करूळ घाटातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या दाडेतून जाणे होय. दहा वर्षांपूर्वी करूळ घाटच्या पहिल्या वळणावरून मजुरांना कोकणात घेऊन जाणारा डंपर दरीत कोसळून 24 मजुरांचा मृत्यू झाला होता. तसेच कुणकेश्‍वर येथून देवदर्शन घेऊन कोल्हापूरकडे येताना घाटातील मधल्या तीव्र वळणावरून ट्रक्स कोसळून शिवाजी पेठेतील सातजणांचा मृत्यू झाला होता. तर गगनबावडा येथून कोकणात वाळूसाठी जणारा ट्रक कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मध्यंतरी घाटाच्या तिसर्‍या वळणावरून ट्रक कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर कोसळलेल्या ट्रकचा सांगाडा अजूनही दरीत पडून आहे. 

काय आहे गॅबियन पद्धत
खचलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी गॅबियन पद्धतीने करावी. कारण, विशिष्ट पद्धतीने दगड रचून ही बांधणी केल्याने पावसाळ्यात या दगडांतून पाणी सहजपणे झिरपते, कोणताही धोका नसतो. गॅबियन पद्धतीला माफक खर्च येतो.

घाटांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट गरजेचे 
महाराष्ट्रातील घाटांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी शासनाने घाटांतील रस्त्यांबाबत ठोस धोरण ठरविले पाहिजे. निधीअभावी घाटांतील रस्त्यांची कामे अडू नयेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शासनाने धोरण आखून घाटांचे स्ट्रक्‍चरल ऑडिटही करणे गरजेचे आहे.

उपाययोजना काय?
भक्‍कम संरक्षक कठडे व उंच ग्रीलची उभारणी करावी

स्पष्ट सिग्‍नल, पांढरे पट्टे, दिशादर्शक फलक लावावेत

पोलिसांची गस्त गरजेची  

गॅबियन पद्धत गरजेची