Sun, Nov 18, 2018 20:01होमपेज › Kolhapur › कर्नाटकातील संघटित टोळ्यांसह तस्कर वळचणीला

कर्नाटकातील संघटित टोळ्यांसह तस्कर वळचणीला

Published On: Apr 06 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 1:10AMकोल्हापूर : दिलीप भिसे

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने पोलिस रेकॉर्डवरील अनेक नामचिन गुन्हेगारांसह तस्करी टोळ्यांची दमछाक होऊ लागली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा टाळण्यासाठी बेळगाव, विजापूरसह अन्य जिल्ह्यांतील सराईत टोळ्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात वळचणीला पडू लागल्या आहेत. जुगारी अड्ड्यांसह ढाब्यावर सराईतांचा वावर वाढला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात गुन्हेगारांविरुद्ध मोहीम राबविली जात आहे. संघटित टोळ्यांसह खून, खंडणी वसुली, मारामारी, राजकीय वर्चस्वातून दहशत माजविणार्‍यांविरुद्ध मोका, तडीपारीचा बडगा उगारण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात किमान दहा विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असल्याने तेथील कायदा सुव्यवस्थेवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. घातक शस्त्रांच्या धाकावर दहशत माजविणारे गुन्हेगार, तस्करी टोळीतील सराईतांना टार्गेट करून कारवाईचे सत्र सुरू झाल्याने गुन्हेगारांची पळताभुई थोडी झाली आहे.  कर्नाटक पोलिसांना चकवा देत गुन्हेगार कोल्हापूर,  सांगली जिल्ह्याच्या आश्रयाला आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या निष्कर्षानुसार किमान दीड हजारांवर सराईत दोन जिल्ह्यांत लपून, छपून वावरत असावेत, असा संशय आहे.

इचलकरंजी, शिरोळ, मिरजेसह जत आणि सांगोला तालुक्यातील जुगारी अड्ड्यांवर सराईत टोळ्यांचा रात्रंदिवस तळ पडल्याचे दिसून येत आहे. सराईतांची वर्दळ रोखण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत, असेही वरिष्ठ सुत्रांकडून सांगण्यात आले.